#TeachersDay मुलांनी उत्तरे नव्हे, प्रश्‍न विचारावेत

#TeachersDay मुलांनी उत्तरे नव्हे, प्रश्‍न विचारावेत

रत्नागिरी - ‘विद्यार्थ्यांना उत्तरे देणे सोपे असते, पण त्यांनी प्रश्‍न विचारले पाहिजेत, त्यांना प्रश्‍न विचारायला प्रवृत्त केले पाहिजे. ही सवय लागली की, नवनवीन प्रश्‍न तयार होतात. त्यातूनच उत्तर शोधण्याची सवय लागते. मुलांना व्यक्त होण्यासाठी याचा उपयोग होतो. पुस्तकाबाहेरील शिक्षणही देणे महत्त्वाचे,’ असे प्रतिपादन प्रयोगशील शिक्षक नारायण शिंदे यांनी केले.

गेली १३ वर्षे जिल्ह्यातील दुर्गम भागात शिकवताना वेगवेगळे प्रयोग प्राथमिक स्तरापासून त्यांनी केले. जेथे शक्‍य असेल, तेथे तंत्रज्ञानाचा वापर केला. सध्या वाडावेसरडा (केंद्र कळंबस्ते) या संगमेश्‍वर तालुक्‍यातील दुर्गम भागात ते काम करतात. शिक्षक दिनाच्या निमित्ताने ‘सकाळ’शी बोलताना ते म्हणाले, ‘खेडेगावातून एकेका शिक्षकाला दोन-तीन वर्ग शिकवावे लागतात. तेथे एकात्मिक नियोजन उपयोगी पडते.’ यासाठी उदाहरण देताना ते म्हणाले, की पाणी या विषयाची तीन ते चार टप्प्यात विभागणी करता येते.

प्रात्यक्षिकामध्ये गावची पाणीपुरवठा, त्याच्या सुविधा, अडचणी याबाबत विद्यार्थ्यांशी चर्चा होते. साठवणूक, त्याच्या पद्धतीत बदल यातला फरक व त्यामुळे होणारे फायदे-तोटे हेही विद्यार्थी जाणून घेतात. त्यानंतर घराघरांत जाऊन भेटी देऊन पालकांकडून त्याची माहिती दिली जाते. त्यानंतर पाण्यावरचे प्रयोग असतात. त्याचे साहित्य मुले जमवतात. त्यामुळे जबाबदारीने काम करायला मुले शिकतात. पाणी शिकता, शिकता मूल्यशिक्षण, पर्यावरण, नागरिकशास्त्र असे विषय अनुषंगाने अप्रत्यक्षरित्या शिकवता येतात. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी निर्माण होते. त्यांची जिज्ञासा वाढते. खेड्यात पाणी शुद्धीकरणासाठी आजूबाजूच्या पर्यावरणातील वस्तू वापरायच्या यातून पर्यावरणविषयक दृष्टीही मिळते.

प्रश्‍नमंजूषा बनवतात
संजय बैलगाडी घेऊन बाजारात गेला, या वाक्‍यावर मुले दहा ते पंधरा प्रश्‍न तयार करतात. त्यांनी प्रश्‍न तयार करायला शिकले पाहिजे. प्रश्‍नमंजूषा आम्ही बनवतो. या आधीच्या शाळेत हा प्रयोग यशस्वी झाला होता. प्रश्‍न विद्यार्थीच बनवतात. त्यामुळे त्यातूनच त्यांची उत्तरे तयार होतात. हे प्रश्‍न विचारणे महत्त्वाचे. विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही पाठाबाहेरील गोष्टीतूनच करायचे. मुलांना व्यक्त होण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असे शिंदे यांनी सांगितले.

त्याचे समाजात जाणवतात परिणाम
 विद्यार्थ्यांना बांधाचे चित्र दाखवले, तेव्हा विद्यार्थ्यांनी आमच्या गावात बांधच नाही, असे सांगितले. त्यामुळे मग त्यानंतर ग्रामपंचायतीत नेले. तेथे त्यांनी प्रश्‍न विचारले. त्याबाबतची शासकीय माहिती त्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांना नकाशा बनवणे येत नाही, असे त्यांनी सांगितले. तेव्हा गावातील पाण्याच्या टाकीवर उंचावर नेऊन येथून दिशा कोणत्या, शाळा कोठे, मंदिर कोठे, पाणी कसे जाते या मुद्यांवर चर्चा झाल्यावर ते नकाशा करायला शिकले. यातून तर्कबुद्धी व भूगोलही शिकता येतो. शालेय व्यवस्थापन समितीत पालकांच्या मनोगतात पाणीविषयक प्रश्‍न विद्यार्थ्यांनी मांडल्यावर त्याचे समाजात परिणामही जाणवतात, असे शिंदे यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com