ज्ञानदानासाठी कोकणात शिक्षक वाडीवस्त्यांवर 

नागेश पाटील
Tuesday, 29 September 2020

कलाशिक्षक तुकाराम पाटील कलेचे प्रात्यक्षिक देतात. ते होतकरू विद्यार्थ्यांना कलेचे साहित्य मोफत देतात. ग्रंथपाल पवार यांनी ग्रंथालयाची पुस्तके वाडीवस्तीवर पोहोचवली. वाचलेल्या पुस्तकांचे समीक्षणही विद्यार्थी करतात

चिपळूण (रत्नागिरी) - तालुक्‍यातील दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नाही. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील शिक्षक वाडीवस्तीवरील मुलांपर्यत पोहोचत आहेत. कलाशिक्षक टी. एस. पाटील विद्यार्थ्यांना कलेचे प्रात्यक्षिक देत आहेत तर वाचनाची गोडी लावण्यासाठी ग्रंथपाल जे. व्ही. पवार यांनी शाळेचं ग्रंथालयंच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे वाडीवस्तीवरील विद्यार्थी अभ्यासात रमू लागले आहेत. 

शासनाने 'शाळा बंद, शिक्षण सुरू' या उपक्रमांतर्गत मोबाईलद्वारे ऑनलाइन, ऑफलाइन शिक्षण ही संकल्पना सुरू केली. त्यातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा सर्व स्तरातून प्रयत्न सुरू केला. विद्यार्थी विविध शैक्षणिक लिंक, शिक्षकांनी तयार केलेले व्हिडिओ आदींद्वारे अध्ययन करत आहेत. तरीही यामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ग्रामीण भागातील वाडी-वस्तीत स्मार्टफोन, नेटवर्कची मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी-चिंचघरी (सती) विद्यालयाने प्रत्यक्ष गाव, वाडीत विद्यार्थी भेट घेण्यावर भर दिला.

कलाशिक्षक तुकाराम पाटील कलेचे प्रात्यक्षिक देतात. ते होतकरू विद्यार्थ्यांना कलेचे साहित्य मोफत देतात. ग्रंथपाल पवार यांनी ग्रंथालयाची पुस्तके वाडीवस्तीवर पोहोचवली. वाचलेल्या पुस्तकांचे समीक्षणही विद्यार्थी करतात. दर आठवड्याला विद्यार्थ्यांना नवनवीन पुस्तके दिली जातात. 

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आमचे शिक्षक गावागावांत, वाडीवाडीत जाऊन उत्साहाने शिकवण्याचे काम करतात. विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर ते मार्ग शोधतात. गावातील मंदिरे, सभागृह येथे हे अध्ययन केले जाते. वाडी-वाडीवर शिक्षकमित्रही नेमले आहेत. 
- राजेंद्र वारे, मुख्याध्यापक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers Visit To Villages For Teaching in SatiChinchaghari Ratnagiri Marathi News