घराला आग लागून दहा लाखांची हानी, सिंधुदुर्गातील कुठल्या गावात घडली घटना

अजय सावंत
Tuesday, 15 September 2020

शॉर्टसर्किटने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : तालुक्‍यातील पावशी मिटक्‍याचीवाडी येथील हेमंत पंडित यांच्या घराला आग लागून सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना आज दुपारी घडली. आगीत घरासह जीवनावश्‍यक वस्तू, दागिने व कपडे जळून खाक झाले. घरातली माणसे नातेवाईकांकडे गेली असल्याने मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
 
पावशी मिटक्‍याचीवाडी येथील हेमंत पंडित घरातील सर्वांसह नेरूर येथे गेले होते. दुपारी त्यांच्या घरातून धूर येत असल्याचे समजताच तेथील ग्रामस्थांनी श्री. पंडित यांना माहिती दिली. अर्ध्या ते एक तास आग धुमसत होती. ग्रामस्थांनी आग विझविण्याचे खूप प्रयत्न केले. कुडाळमधील अग्निशमन दलाच्या बंबाने आग विझविण्यात आली; मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यात सर्व वस्तू जळून खाक झाल्या. घटनास्थळी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, पावशी सरपंच बाळा कोरगावकर, उपसरपंच दीपक आंगणे, राजू शेटये, ग्रामसेवक सरिता धामापूरकर, वृणाल कुंभार, तलाठी हार्दळकर, पोलीस, महावितरणचे अधिकारी यांनी भेट देऊन पाहणी केली. शॉर्टसर्किट झाल्याने घराने पेट घेतला. 

कुटुंबाला मोठा धक्का 
पंडित कुटुंबियांचे उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे. घरातील दागिने, कपडे, जीवनावश्‍यक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे आदी सर्वच साहित्य जळून खाक झाले. सुमारे 10 लाखाचे नुकसान झाले. त्यामुळे कुटूंबावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.  

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten lakh loss due to house fire, an incident took place in a village in Sindhudurg