अंधारात ही तिने लावली प्रकाशाची ज्योत : अशिक्षित कुटुंबातली गीता झाली ज्ञानशलाका....

राजेंद्र बाईत
Friday, 31 July 2020

दहावीला ९२.४० टक्के; घोरपी समाजात नवचैतन्य, प्रशासकीय सेवेचे स्वप्न, राजापूर हायस्कूलमध्ये दुसरी...

राजापूर (रत्नागिरी) :  ना सुसज्ज घर, ना आवश्‍यक असलेल्या सोयीसुविधा, मच्छीमार वडील, घरकाम करणारी आई. त्यामुळे घरची बेताचीच आर्थिक स्थिती. पालकांना ही शिक्षणाचा गंध नाही. अशा घोरपी कुटुंबातील गीता बारक्‍या चव्हाण हिने दहावीला ९२.४० टक्के मिळवले. राजापूर हायस्कूलमध्ये ती दुसरी आली. 

लहानपणापासून कुटुंबाचे आर्थिकदृष्ट्या पिचलेले जीवन बदलण्याचे स्वप्न साकारण्याच्यादृष्टीने गीताने स्पर्धा परीक्षा द्यायचे ठरवले आहे. अन्य समाजाच्या तुलनेत शिक्षणासह सरकारी नोकरीमध्ये कमी टक्का असलेल्या घोरपी समाजाला बदलाच्या आशेचा नवा किरण दाखविला आहे.    

हेही वाचा- ऑनलाईन जाहिराती पाहताय तर ही बातमी वाचाच... -
आई भारती, वडील बारक्‍या चव्हाण यांच्यासह एक भाऊ आणि पाच बहिणी असे तिचे कुटुंब. मोठा भाऊ रमेश डी.एड., पण नोकरी नाही. महागडी शिक्षण साहित्याची गीताकडे वानवा होती. नियोजनबद्ध अभ्यासाची जोड देत, सुयश संपादन केले आहे. कोंढेतड जिल्हा परिषद शाळा आणि विश्‍वनाथ विद्यालयात प्राथमिक शिक्षणाचे धडे गिरविलेल्या गीताने आवडीच्या संस्कृत विषयामध्ये मिळविलेले शंभर गुण तिने घेतलेली मेहनत आणि तिच्यामध्ये ठासून भरलेली गुणवत्ता अधोरेखित करते.

नियमितपणे पहाटे मासेमारीला जाताना अभ्यासासाठी आपणाला उठविणारे वडील, लोकांच्या घरची कामे करत काहीही कमी पडू न देणारी आई, मोठ्या भावासह शिक्षक भारत जानकर, सौ. जाधव, सौ. जानकर यांचे मार्गदर्शन यशामध्ये महत्वाचे ठरल्याचे गीता सांगते. सतीश रहाटे, संजय कुवेस्कर, स्नेहा कुवेस्कर आदींनी सहकार्य केल्याचे ती सांगते.

हेही वाचा-चाकरमान्यांनो गणेशोत्सवाला अत्यावश्यक असेल तरच कोकणात या ;  यांनी केले आवाहन.... -

आम्ही अशिक्षित राहिलो. उन्हाळा-पावसाळा प्लास्टिक कागदाचे छप्पर असलेल्या झोपडीत वाढलो, जगलो. आम्ही अनुभवलेले जीवन आमच्या मुलांच्या नशिबी येता कामा नये. यासाठी उपसलेल्या कष्टाचे गीताने चीज केले.
- बारक्‍या चव्हाण, वडील

संपादन - अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tenth result positive story in rajapur Second in Rajapur High School