esakal | दहावी, बारावीचे विद्यार्थी संभ्रमात 
sakal

बोलून बातमी शोधा

Tenth Twelfth Standard Students In Confusion About Exam

शाळा वेळेत सुरू न झाल्याचा सर्वाधिक फटका दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना बसणार आहे. बोर्डाची परीक्षा असल्याने किमान 50 टक्‍के अभ्यासक्रम तरी विद्यार्थ्यांना शिकविला पाहिजे तरच विद्यार्थी चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतील.

दहावी, बारावीचे विद्यार्थी संभ्रमात 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

चिपळूण ( रत्नागिरी) - कोरोनामुळे शाळा सुरू होण्यास विलंब झाला आहे. त्यामुळे दहावी व बारावीची परीक्षा मार्च व एप्रिलमध्ये घेणे शक्‍य नाही. त्यामुळे 2020-21 च्या शैक्षणिक वर्षातील दहावी व बारावीची वार्षिक परीक्षा मे किंवा जूनमध्ये होण्याची शक्‍यता आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडू नये यासाठी सोशल मीडियातून शिक्षणाचे धडे देण्याचे काम काही शाळांमध्ये सुरू आहे; मात्र विशेष करून दहावी आणि बारावीचे विद्यार्थी संभ्रमात आहेत. 

दरवर्षी मे अखेरीस शाळा सुरू होतात. त्यामुळे शैक्षणिक वर्षाचे नियोजन केले जाते. शिक्षण खात्याकडूनही चाचणी परीक्षांसह सहामाही व वार्षिक परीक्षेचे शाळा सुरू झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर केले जाते. दरवर्षी मार्चमध्ये बारावीची, तर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दहावीची वार्षिक परीक्षा पार पडते. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षांना सामोरे जाताना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळतो; मात्र यावेळी कोरोनाच्या संकटामुळे अर्धे शैक्षणिक वर्ष पूर्ण झाले तरी अद्याप शाळा सुरू झालेल्या नाहीत. तसेच शिक्षण खात्याने अभ्यासक्रमात 30 ते 40 टक्‍क्‍यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत वेळेत परीक्षा घेणे शक्‍य नसल्याची जाणीव शिक्षण खात्यालाही झाली आहे. 

शाळा वेळेत सुरू न झाल्याचा सर्वाधिक फटका दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांना बसणार आहे. बोर्डाची परीक्षा असल्याने किमान 50 टक्‍के अभ्यासक्रम तरी विद्यार्थ्यांना शिकविला पाहिजे तरच विद्यार्थी चांगल्या प्रकारे परीक्षा देऊ शकतील. अन्यथा विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण होऊ शकते. म्हणून काही शाळांमध्ये व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्था, तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीसह अन्य शैक्षणिक संस्थांनी असा उपक्रम सुरू केला आहे. याबाबत माहिती देताना मुख्याध्यापक अन्वर मोडक म्हणाले की, आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हॉटस्‌ऍपवर अभ्यास पाठवतो. तसेच प्रश्‍नपत्रिकाही पाठवतो. विद्यार्थी उत्तरपत्रिका तयार करून पाठवतो. शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासल्या जातात. हे सर्व अधिकृत नाही. तरीही विद्यार्थी शिक्षणापासून लांब जाऊ नयेत यासाठी आमची धडपड सुरू आहे. 

शाळा कधीपासून सुरू होणार याची निश्‍चित माहिती नाही. दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या तर अभ्यासक्रम कपात करून वेळेत परीक्षा घेणे शक्‍य नाही. अन्यथा परीक्षांना विलंब होऊ शकतो. कोरोनाचे संकट किती दिवसांत कमी होते, यावर बरेच काही अवलंबून आहे. 
- अन्वर मोडक, मुख्याध्यापक, सावर्डे विद्यालय. 

loading image