Ratnagiri : देखणा ग्रेटर फ्लेमिंगो आढळला गावखडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

flemingo

देखणा ग्रेटर फ्लेमिंगो आढळला गावखडीत

रत्नागिरी : तालुक्यातील गावखडी येथे अत्यंत देखण्या आणि ऐटदार दिसणारा ग्रेटर फ्लेमिंगो जातीचा पक्षी (रोहित) आढळून आला आहे. उरण, उजनी, जायकवाडी जलाशयाजवळ हे पक्षी मोठ्या प्रमाणात आढळतात. विशेषतः कोकणामध्ये अलिबागच्या खाली हे पक्षी कमी प्रमाणात येतात. नेवरे येथे हे पक्षी नऊ वर्षांपूर्वी आढळून आले होते. त्यानंतर आता गावखडीत आढळला आहे. हे पक्षी कळपाने राहातात; मात्र गावखडीमध्ये आढळलेला फ्लेमिंगो हा चुकार आहे, असे पक्षीमित्रांचे मत आहे. दोन दिवस तो तेथेत दिसत आहे. तेथील खाद्य संपल्यानतंर तो अन्यत्र स्थलांतर करेल, असेही त्याचे मत आहे.

गावखडी येथे आढळलेल्या फ्लेमिंगोचे छायाचित्र स्वस्तिक गावडे या तरुणाने टिपले आहे. त्यांनी याची माहिती वनक्षेत्रपाल राजेंद्र पाटील यांना दिली आहे. त्या अनुषंगाने वनविभाग त्यावर लक्ष ठेवून आहे. कांदळवनाच्या ठिकाणी हा पक्षी सध्या वास्तवाला आहे. थंडीच्या मोसमातच हे पक्षी स्थलांतर करतात. फ्लेमिंगो अर्थात रोहित पाणी असणाऱ्या ठिकाणी राहणे पसंत करतो. रोहित त्यांच्या लांब गळ्यासाठी, काठीसारखे पाय आणि गुलाबी किंवा लालसर पंख या खास गोष्टीसाठी ओळखले जातात. रोहित पक्ष्याच्या सहा प्रजाती आहेत.

त्यामध्ये लेसर प्लेमिंगो, चिलियन फ्लेमिंगो, ग्रेटर फ्लेमिंगो, अॅडियन फ्लेमिंगो, जेन्स (किंवा पुना) फ्लेमिंगो आणि अमेरिकत (किंवा कॅरिबियन ) फ्लेमिंगो यांचा समावेश आहे. रोहित पक्षी भारतातमध्ये उजनी जलाशय (पुणे) किंवा जायकवाडी (औरंगाबाद) मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हे पक्षी दिसायला उंच, फिकट गुलाबी, पांढरे किंवा लालसर पंख, लांब आणि काठीसारखे दिसणारे साधारण गुलाबी शेड असणार पाय, काळ्या रंगाची चोच आणि लांब मान या सगळ्या शारीरिक वैशिष्ट्यांमुळे हे खुप सुंदर आणि आकर्षक दिसतात.

फ्लेमिंगोचे वजन साधारण साडेतीन किलोच्यावर आहे. फ्लेमिंगो हा मांसाहारी पक्षी आहे. हा पक्षी गिधाडाहून मोठा असला तरी ते मासे, सुक्ष्म जीव, लहान कीटक आणि अळ्या, निळे-हिरवे आणि लाल एकपेशीय वनस्पती खातात. रोहित सरोवर किवा तलावाच्या आसपास राहतात. त्यांच्या प्रजनन क्षेत्रात हवामान किंवा पाण्याच्या पातळीत होणाऱ्या बदलामुळे हे पक्षी वेगवेगळ्या ठिकाणी स्तलांतर करतात.

फ्लेमिंगो पक्ष्यांचा हा हंगाम स्थलांतराचा आहे. कळपाने ते स्थलांतर करतात; मात्र गावखडी येथे आढळलेला फ्लेमिंगो चुकार आहे. तेथील खाद्य संपल्यानंतर तो तेथून स्थलांतर करेल. नेवरे येथे २०१२ ला फ्लेमिंगो पक्षी आढळले होते.

- सुधीर रिसबूड, पक्षी अभ्यासक

loading image
go to top