esakal | Chiplun : वाशिष्ठीभोवती भिंत धोक्याला निमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

kokan

वाशिष्ठीभोवती भिंत धोक्याला निमंत्रण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण : चिपळूण नगरपालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे का? असेल तर त्यात वाशिष्ठी, शिव या महत्त्वाच्या नद्या आणि त्यांना मिळणारे सर्व जलप्रवाह यांच्याभोवती हरितपट्टे देऊन त्यांना संरक्षित केले आहे का? या नद्यांची आजची पातळी आणि खोली किती, हे बघणे गरजेचे आहे. खरे तर हा अभ्यास जलसंसाधन व्यवस्थापन परिषदेने केला असणारच; त्याशिवाय त्यांनी आपल्या नकाशात लाल, निळ्या रेषा दाखविल्या नसतील. पण हे नकाशे कितपत बरोबर आहेत? त्यांनी नदीची आताची पातळी मोजली आहे का, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. वाशिष्ठीभोवती संरक्षक भिंत बांधणे धोकादायक आहे, असे प्रतिपादन नदीतज्ज्ञ परिणिता दांडेकर यांनी केले.

राष्ट्र सेवा दल आयोजित आपत्ती निवारण परिषदेत त्या बोलत होत्या. दांडेकर म्हणाल्या, ‘‘वाशिष्ठीचा खोरेनिहाय अभ्यास होणे गरजेचे आहे. नुकतीच या संबंधातील एक याचिका माझ्या पाहण्यात आली. या याचिकेतील काही मुद्दे योग्य आहेत; मात्र संरक्षक भिंत बांधण्याचा मुद्दा खटकणारा आहे. वाशिष्ठीसारख्या प्रचंड प्रमाणात गाळ साचलेल्या नदीभोवती संरक्षक भिंत बांधणे म्हणजे नदीतील पाण्याची पातळी आतल्या आत उंचावत नेण्यासारखेच आहे.’’ हे अत्यंत धोकादायक आहे, असा इशाराही दांडेकर यांनी दिला.

नदीच्या वरील भागात कितीही उपचार केले तरी पूरस्थितीत पाणी नदीच्या पात्राबाहेर येणारच आहे. म्हणूनच वाशिष्ठीत आतापर्यंत झालेल्या उत्खननाचा आढावा घेणे गरजेचे आहे. हे उत्खनन आणि गाळ काढण्याचे काम अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने केले जाऊ शकते. नदीतील गाळ काढून तसाच काठावर रचून ठेवला जाऊ शकतो. वाशिष्ठीत उत्खनन करणे आवश्यक असले तरी ते अत्यंत जबाबदारीने आणि शास्त्रीय पद्धतीने करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: कोकणच्या राजकारणात नव्या राष्ट्रीय पक्षाची एंट्री

याचा विचार करूनच उत्खनन करावे

नदीतील एखाद्या जागी पाण्याची पातळी किती होती, तेथे साचलेला गाळ नेमका किती आहे, हा गाळ काढल्यावर त्याचा विनियोग नेमका कसा करायचा, या बाबींचा विचार करूनच हे उत्खनन केले जावे, असे मत त्यांनी मांडले. वाशिष्ठी नदीत येणारा गाळ नेमका कुठून आणि कसा येतो, त्याचाही शोध घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

गाळाची उगमस्थाने

कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यांसाठीचे उत्खनन केल्यानंतर बाहेर आलेला मलबा वाशिष्ठीच्या तीरावर, कोळकेवाडीतील धरणाच्या काठावर तसाच रचून ठेवलेला आहे. राष्ट्रीय महामार्गासाठी ठिकठिकाणचे डोंगर कापलेले आहेत. सर्वत्र चाललेली बांधकामे आपला राडारोडा तसाच रचून ठेवतात. विकास प्रकल्प, फलोद्यान, रस्ते यामुळे डोंगर साफ केल्याने प्रचंड धूप होत आहे. ही सारी वाशिष्ठीतील गाळाची उगमस्थाने आहेत.

पर्यावरणीयदृष्ट्या अती संवेदनशील

हवामान बदलामुळे ठराविक ठिकाणी, ठराविक काळात अशा प्रकारचा पाऊस पडण्याचे प्रमाण आता वाढले आहे. त्याचे परिणाम कोकण, मराठवाडा यासारख्या पर्यावरणीयदृष्ट्या अती संवेदनशील विभागात अत्यंत गंभीर होत जाणार आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवे. या स्थितीत राज्य, जिल्हापातळीवरील सर्व शासकीय यंत्रणा, भारत सरकारची हवामान बदल कृती योजना, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या सर्वांना कामाला जुंपले गेले तरच चिपळूणकरांच्या परिश्रमाला अर्थ प्राप्त होईल, असे दांडेकर यांनी सांगितले.

दांडेकर यांचे काही प्रश्‍न, अपेक्षा, ऊहापोह

  1. नगरपालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला?

  2. संरक्षक भिंत बांधण्याचा मुद्दा खटकणारा

  3. नदीची पातळी उंचावत नेण्यासारखेच होईल

  4. कितीही उपचार केले तरी पूरस्थितीत पाणी पात्राबाहेर येणार

  5. आतापर्यंत झालेल्या उत्खननाचा आढावा घ्यावा

  6. वाशिष्ठीत उत्खनन आवश्यक; खबरदारी घ्यावी

  7. उत्खनन अत्यंत जबाबदारीने, शास्त्रीय पद्धतीने व्हावे

loading image
go to top