जंगलात उंचीवर बांधली झोपडी अन् शिक्षण, नोकरीसाठी त्या दोघी झाल्या ऑनलाईन

नीलेश मोरजकर
Tuesday, 15 September 2020

कोकणातील गावांतून नेटवर्कच नसल्याने अनेक अडचणी येत आहेत.

बांदा (जि. सिंधुदुर्ग) : जंगलात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी जातात. ते पर्यटन तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामाच्या व्यापातून रिलॅक्स करणारे असते़ पण कोकणात मोबाईल रेंजसाठी जंगलात जावे लागते आहे. दोन युवतींनी जंगलात उंचीवर झोपडी बांधून मोबाईल रेंज पकडली आणि दोघींपैकी एकीने अभ्यास सुरू केला तर दुसरीची नोकरी टिकविण्यासाठीची धडपड. त्या दोघीही त्यात यशस्वी झाल्या. भर पावसळ्यातही त्यांनी दिवसभर तेथे मुक्काम ठोकून आपले कर्तव्य पार पाडले. 

कोरोनामुळे 'ऑनलाईन' हा मानवी जीवनशैलीचा परवलीचा शब्द झाला आहे. शिक्षणापासून ते नोकरीही "वर्क फ्रॉम होम' या ऑनलाईन शब्दाशी जोडली गेली आहे; मात्र गावांतून नेटवर्कच नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. यावर तांबुळी (ता. सावंतवाडी) या दुर्गम गावातील दोन युवतींनी पर्याय शोधला असून, तांबुळी-डेगवेच्या सीमेवर उंच ठिकाणी झोपडी बांधून दोन महिन्यांपासून त्या ऑनलाईन अभ्यास व काम करत आहेत. शिक्षण व नोकरी वाचविण्यासाठी त्यांची रोजची धडपड खरोखरच कौतुकास्पद आहे. 

कोरोनामुळे जिल्ह्यात गावी कुटुंबासह आलेले चाकरमानी सहा महिन्यांहून अधिक काळ लोटला तरीही येथेच अडकले आहेत. जग "डिजिटल'कडे वळताना ग्रामीण भागातील या युवतींची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी होणारी फरपट वेदनादायी आहे. काही दिवसांपूर्वीच दारिस्ते (ता. कणकवली) येथील स्वप्नाली सुतार या युवतीची जंगलात झोपडी बांधून अभ्यासाची धडपड समाजमाध्यमात व्हायरल झाली होती. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने तिला तिच्या दुर्गम गावातील घरी इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून दिली होती. 

तांबुळी-टेंबवाडी येथील हेमा सावंत व संस्कृती सावंत या दोघी युवती मूळच्या मुंबईतील. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्राने मार्चला संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर केले. मुंबईतील वाढता धोका लक्षात घेता या दोघींच्या कुटुंबीयांनी तांबुळी गावी येण्याचा निर्णय घेतला. बांदा शहरापासून 12 किलोमीटरवर असलेले हे गाव दुर्गम असून कव्हरेज क्षेत्राबाहेर आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कामावर मर्यादा आल्या. 

निसर्गाशीही सामना... 
हेमा मुंबई-तुर्भे येथे एका खासगी कंपनीत अधिकारी आहे. मार्चमध्ये ती आई-वडील, भाऊ यांच्यासह गावी आली. सकाळी 10 ते 1 व दुपारी अडीच ते साडेपाच या कालावधीत तिला ऑनलाईन काम करावे लागते. तेथील संस्कृती सावंत दहावीत आहे. तीही हेमासोबत या ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येते. जोरदार पावसातही संपूर्ण पावसाळ्यात दोन्ही मुलींनी नोकरी आणि अभ्यास नियमित सुरू ठेवला आहे. त्यासाठीचे कष्ट त्या घेत आहेत. 

भारत नेट प्रकल्प मार्गी लागावा 
केंद्राच्या भारत नेट प्रकल्पाअंतर्गत देशातील सर्व ग्रामपंचायती ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जोडण्यात येणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 429 पैकी 361 ग्रामपंचायती या फेज वनमध्ये समाविष्ट असून टप्प्याटप्प्याने या सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबरने जोडून सर्वांना इंटरनेट सेवा दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने भारतातील ग्रामीण भागही जगाशी जोडण्यात येणार आहे; मात्र ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होणे अत्यंत आवश्‍यक आहे. 

भारत सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून डिजिटल व्यवहारांवर भर दिला आहे; मात्र ग्रामीण भागात कनेक्‍टिव्हिटीच नसल्याने ऑनलाईन व्यवहारांवर मर्यादा येत आहेत. शिक्षणासाठी व नोकरीसाठी ग्रामीण भागातील मुलांना खडतर परिस्थितीत काम करावे लागत आहे. यावर मार्ग काढल्यास अनेक विद्यार्थ्यांना ते उपयोगी ठरणार आहे. 
- हेमा सावंत, तांबुळी 

संपादन : विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are many problems due to lack of network from Konkan villages.