वैभववाडी तालुका कोरोनामुक्त 

एकनाथ पवार
Thursday, 22 October 2020

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा, आशा स्वंयसेविका, आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि तालुक्‍यातील जनतेने प्रशासनाला केलेले सहकार्य यामुळे वैभववाडी तालुक्‍यात सुरूवातीपासुन कोरोना रूग्णांची संख्या तुलनेत कमी आढळुन आली.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - आशा, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाने केलेल्या नियोजनबध्द कामामुळे वैभववाडी तालुका आज कोरोनामुक्त झाला आहे. तालुक्‍यात सद्यस्थिती एकही सक्रीय रूग्ण नाही. तालुक्‍यात एकुण 138 कोरोनाबाधीत रूग्ण आढळुन आले होते. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा, आशा स्वंयसेविका, आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन आणि तालुक्‍यातील जनतेने प्रशासनाला केलेले सहकार्य यामुळे वैभववाडी तालुक्‍यात सुरूवातीपासुन कोरोना रूग्णांची संख्या तुलनेत कमी आढळुन आली. गणेशोत्सवानंतर तालुक्‍यात रूग्णांची संख्या अचानक वाढली. याचवेळी बाजारपेठेतील काही डॉक्‍टर, सरकारी कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले. त्यामुळे प्रशासनाने 27 ऑगस्टपासुन वैभववाडी बाजारपेठ कंटेन्मेंट झोन जाहीर केला. 14 दिवस बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

या निर्णयानंतर काहीनी नाराजी व्यक्त केली; परंतु या निर्णयाचा चांगला परिणाम तालुक्‍यात दिसुन आला. चौदा दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर उंबर्डे, भुईबावडा बाजारपेठामध्ये स्थानिक ग्रामस्थांनी जनता कर्फ्यु पुकारला. याशिवाय शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम हाती घेतली. यामध्ये आशा स्वंयसेविका आणि आरोग्य सेविकांनी घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण केले. याचा एकुणच परिणाम तालुक्‍यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यामध्ये झाला. 

आतापर्यंत 138 रुग्ण 
तालुक्‍यात आतापर्यंत 138 रूग्ण आढळले होते. शेवटचा रूग्ण 18 ऑक्‍टोबरला आढळला होता; परंतु तो तत्काळ उपचारासाठी मुंबईला गेला; परंतु त्या रूग्णाव्यतिरिक्त एकही रूग्ण तालुक्‍यात आढळला नाही. तालुक्‍यात सध्या एकही रूग्ण सक्रीय नाही. त्यामुळे आज तालुका कोरोनामुक्त झाला आहे.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no corona patient in Vaibhavwadi taluka