दाभोळमधील विनापरवाना नौकांवर आक्षेपार्ह काहीच नसल्याचा निर्वाळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

दाभोळ - गेले ४ दिवस दाभोळ समुद्रात विनापरवाना आलेल्या २ चिनी मच्छिमारी बोटींमुळे विविध शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती, या दोन्ही बोटींवर ३८ खलाशी असून या सर्वांची तसेच दोन्ही बोटींची कसून तपासणी सीमाशुल्क विभाग, सागरी पोलिस व भारतीय तटरक्षक दलाकडून करण्यात आली असून या दोन्ही बोटींवर काहीही आक्षेपार्ह नाही, असा निर्वाळा सुरक्षा यंत्रणांनी दिला.

दाभोळ - गेले ४ दिवस दाभोळ समुद्रात विनापरवाना आलेल्या २ चिनी मच्छिमारी बोटींमुळे विविध शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती, या दोन्ही बोटींवर ३८ खलाशी असून या सर्वांची तसेच दोन्ही बोटींची कसून तपासणी सीमाशुल्क विभाग, सागरी पोलिस व भारतीय तटरक्षक दलाकडून करण्यात आली असून या दोन्ही बोटींवर काहीही आक्षेपार्ह नाही, असा निर्वाळा सुरक्षा यंत्रणांनी दिला. या साऱ्यांवर गुन्हा कोणी व कोणत्या कायद्याखाली दाखल करायचा, हा यक्ष प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. 

गेले चार दाभोळ समुद्रात विनापरवाना आलेल्या २ चिनी बोटी काल सायंकाळी दाभोळ खाडीत वादळामुळे आणण्यात आल्या. आज दुपारी जिल्ह्याधिकारी सुनील चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगलमुगले, नेव्हीचे लेफ्टनंट कमांडर वैभव भारद्वाज, सीमाशुल्क विभागाचे सहायक आयुक्त किरो आदींनी या दोन्ही बोटींना भेट दिली.

‘वायू’ वादळाच्या पार्श्वभूमीवर तसेच या दोन्ही बोटी दाभोळ खाडी मुखाशी असलेल्या सॅण्ड बारकडे सरकू लागल्याने त्या सॅण्ड बारमध्ये रुतून बसण्याचा धोका उत्पन्न झाल्याने या दोन्ही बोटी काल सायंकाळी दाभोळ खाडीत आणण्यात आल्या आहेत. दुपारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, प्रवीण पाटील, दापोलीचे प्रांत, तहसीलदार, दाभोळचे पोलिस निरीक्षक बोडके, बंदर निरीक्षक महानवर तसेच नेव्हीचे अधिकारी यांनी बोटींवर जाऊन पाहणी केली, यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी दुभाषीही आल्या होत्या.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन उगलमुगले व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील यांना या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यास सांगितले आहेत, मात्र गुन्हा कोणी व कोणत्या कायद्याखाली दाखल करायचा, हा यक्ष प्रश्न या अधिकाऱ्यांना पडला आहे.

दरम्यान, जागरूक नागरिकांनी पुणे येथील सीमाशुल्क विभागाचे आयुक्त यांनी चार दिवस उलटले तरी दाभोळ येथे भेट न दिल्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गृह मंत्री अमित शहा यांचेकडे ट्‌वीटद्वारे तक्रार केली होती, त्याची गंभीर दखल घेण्यात आली असून उद्या सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त दाभोळ येथे येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is nothing objectionable to the unauthorized boats in Dabhol