गोव्यातून येणाऱ्या प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग 

Thermal scanning of everyone coming from Goa
Thermal scanning of everyone coming from Goa

ओरोस (सिंधुदुर्ग) - कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने, मिशन बिगीन अगेनअंतर्गत, राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने उद्यापासून (ता. 25) गोवाच्या सीमेवर कार्यवाही सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. त्यानुसार प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. लक्षणे असलेल्या व्यक्तीची अँटिजेन टेस्ट करण्यात येणार आहे. यात बाधित आलेल्या व्यक्तीला उपचारासाठी येणारा खर्च सोसावा लागणार आहे. 

राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर पोलिस अधीक्षक तुषार पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र सावंत, उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड, सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे, वेंगुर्लाचे तहसीलदार प्रवीण लोकरे, दोडामार्गचे तहसीलदार श्री. खानोलकर, पोलिस निरीक्षक सुनील धनावडे, पोलिस निरीक्षक शिवाजी कोळी, वाहतूक शाखा पोलिस निरीक्षक अविनाश भोसले आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते. 

पत्रादेवी येथे महसूल, पोलिस आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाची तीन पथके तैनात करण्याविषयी सूचना यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. दोडामार्ग येथे दोन आणि सातार्डा, आरोंदा, रेडी आणि आयी या ठिकाणी तपासणीसाठी एक पथक तैनात करण्यात यावे. जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी प्रवाशांना कमीत कमी वेळ थांबावे लागेल असे नियोजन करावे. थर्मल स्कॅनिंग करावे. ताप अशी लक्षणे असलेल्या प्रवाशांची अँटिजेन टेस्ट करावी. जर टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांना नजीकच्या कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावे, कोविड केअर सेंटरमधील सर्व खर्च हा संबंधित प्रवाशांनी करावयाचा आहे. त्यादृष्टीने महसूल व आरोग्य यंत्रणेने समन्वय साधून काम करावे. बांदा येथील प्रवाशांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तर दोडामार्ग येथील प्रवाशांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठवावे, अशा सूचना केल्या. 

96 तासांच्या आतील अहवाल आवश्‍यक 
रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांचीही रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात यावी. त्यासाठी कुडाळ, सावंतवाडी, कणकवली या स्थानकांवर आरोग्य पथके तैनात ठेवावीत. गोवा, गुजरात, राजस्थान आणि दिल्ली या राज्यांमध्ये थांबा असलेल्या गाड्यांमधून जिल्ह्यात प्रवेश घेण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे आवश्‍यक आहे. तसेच हा अहवाल प्रवाशांनी आपल्या सोबत ठेवावा. ही आरटीपीसीआर नमुना चाचणी सिंधुदुर्गात प्रवेश करण्यापूर्वी 96 तासांच्या आत झालेली असावी. आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक अहवाल नसलेल्या प्रवाशांच्या शरीराचे तापमान आणि कोविड - 19 लक्षणांची तपासणी संबंधित रेल्वे स्थानकावर केली जाईल. लक्षणे नसलेल्या प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील त्यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या प्रवाशांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाईल. सीसीसीसह पुढील काळजी घेण्याचा खर्च स्वतः प्रवाशाला उचलावा लागेल. 

गोवा विमानतळ प्रशासनाशी समन्वय 
विमानाने येणाऱ्या प्रवाशांच्या माहितीसाठी निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. जयकृष्ण फड यांनी गोवा विमानतळ प्रशासनाशी समन्वय ठेवावा व प्रवाशांची माहिती संबंधित तालुक्‍यातील तहसीलदार आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे द्यावी. दररोज कामानिमित्त व नोकरीनिमित्त गोवा येथे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या. 

- संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com