रत्नागिरी : बोट उलटल्याने बुडून तीन जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 January 2021

बुडालेल्या सात जणांना वाचवण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत

रत्नागिरी - तालुक्यातील मजगाव म्हामूरवाडी येथे खाडीत होडी उलटून तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात दोन महिलांसह सहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. बुडालेल्या सात जणांना वाचवण्यात आले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली.

राहिला नदीम बारगीर (वय 35), जबीन मोहम्मद अली जामखंडीकर (50) आणि  शायान यासाीन शेख (वय 8) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. ही घटना समजल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक मोहितकुमार गर्ग, उपविभागिय पोलिस अधिकारी सदाशिर वाघमारे, पोलिस निरीक्षक श्री. चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील म्हामूर वाडी येथे राहणारे नदीम बारगीर हे मिरज येथे सासुरवाडीला राहतात. वर्षातून दोन वेळा म्हामुरवाडीत रहावायास येतात. गावातील विवाह सोहळ्यासाठी नदीम बारगिरी आपल्या कुटूंबियांसह गावी आले होते. विवाह कार्य आटोपल्यानंतर रविवारी (ता. 17) आरे-वारे, गणपतीपुळे येथे फिरून आले. सोमवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास सर्वजणं खाडीत फिरायला गेले. गावातील मुक्तार बारगिर यांची मुनीब नावाची होडी घेऊन ते पाण्यात उतरले. होडीत नदीम बारगिर यांच्यासह पत्नी राहीला बारगिर, मुलगा जियान बारगीर, मुलगी अप्सरा बारगीर (11), सासू शमशाद दिलावर गोलंदाज (45), मेव्हुणा मुबारक दिलावर गोलंदाज (24), मेव्हुणी सुलताना यासीन शेख (28) आणि त्यांची दोन मुले रेहान यासीन शेख  (10), शायान यासीन शेख (8), यास्मिन दिलावर गोलंदाज (25), चुलत आजी सासू जबीना अली जामखींडकर (50), वाडीतील आहील मिलाद बारगीर (2) हे सर्व बसलेले होते. नदीम बारगिर हे होडी चालवत होते. होडीत पाणी शिरल्यामुळे ती कलंडली. यामध्ये राहीला बारगिर आणि जबीन जामखंडीकर, शायान शेख हे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. इतर नऊ जणं होडीच्या थर्मकॉलच्या सेण्टी गार्डला पकडून राहीले होते. 

हे पण वाचा - प्रचाराच्या शेवटच्या दिवशी ढवळीतील उपसरपंच जगातून निघून गेला आणि आज तोच निवडून आला  

हा प्रकार किनार्‍यावरुन जाणार्‍या शाहीद बोरकर, अझर मिरकर, उमेद पटेल यांनी पाहीला. त्यांनी धाव घेत किनार्‍यावरील दुसरी होडी घेऊन बुडालेल्या ठिकाणाकडे धाव घेतली. किनार्‍यावरील एका घराच्या टेरेस वरील एका व्यक्तीने हा प्रकार पाहीला आणि बुडालेल्यांना वाचवण्यासाठी आरडो ओरड केला. दुसरी होडी घेऊन बुडालेल्या ठिकाणी पोचपर्यंत तिघांचा बुडून मृत्यू झाला होता. उर्वरित सात जणांना पाण्यातून सुरक्षितरित्या किनार्‍यावर आणण्यात आले. बुडालेल्या दोन महिलांसह मुलगा यासिन यांना पोहायला येत नव्हते. 

संपादन - धनाजी सुर्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thre dead in ratnagiri majgov mhasurwadi