ब्रेकिंग - राजापूर ग्रामीण रूग्णालयातील आणखीन तीन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण  

Three other staff members of Rajapur Rural Hospital contracted corona
Three other staff members of Rajapur Rural Hospital contracted corona

राजापूर - कोरोनाच्या अनुषंगाने आजची सकाळ आणि सायंकाळ राजापूरकरांसाठी धक्कादायक ठरली आहे. राजापूर ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यासह त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झालेले असताना आज आलेल्या वैद्यकीय अहवालामध्ये याच ग्रामीण रूग्णालयातील आणखीन तीन कर्मचार्‍यांना आणि त्या वैद्यकीय अधिकार्‍याच्या एका कुटुंब सदस्याला कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 


कोदवली साईनगर भागात सापडलेल्या कोरोना रूग्णाच्या संपर्कातील त्याची पत्नी आणि मुलाचा अहवालही कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दिवसभरामध्ये तब्बल सहा कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. 

दिवसागणिक शहर कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले असून आजच्या वैद्यकीय अहवालाने राजापूरवासियांना चांगलाच धक्का बसला. आजपर्यंत शहरामध्ये दहा कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. तर, तालुक्यातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 48 वर जावून पोहचली आहे. 

शहरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शहरवासिय भितीच्या छायेखाली आहेत. मागील तीन महिने कोरोनाला शहरापासून दूर ठेवण्यात शहरवासियांना यश आले होते. मात्र चार-पाच दिवसांपूर्वी शहरात एका महिलेला कोरोनाची लागण झाली आणि सेफझोनमध्ये असलेल्या शहरात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर सातत्याने रूग्णसंख्या वाढत आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये राजापूर ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यासह त्याच्या पत्नीचा समावेश आहे.

मात्र, आजचा दिवस राजापूरकरांसाठी कोरोनाच्या अनुषंगाने धक्कादायक ठरला आहे. आज सकाळी आलेल्या वैद्यकीय अहवालामध्ये कोदवली साईनगर भागात सापडलेल्या त्या कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कातील त्याची पत्नी आणि मुलाचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. या धक्क्यातून दिवसभर राजापूरकर सावरत असताना सायंकाळी आलेल्या वैद्यकीय अहवालाने राजापूरांना पुन्हा एकदा धक्का दिला. त्यामध्ये राजापूर ग्रामीण रूग्णालयातील आणखीन तीन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच, दोन दिवसांपूर्वी कोरोना पाॅझिटिव्ह आढळलेल्या याच रूग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍याच्या कुटुंबातील आणखीन एका सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. दिवसभराच्या अखेरनंतर राजापूर शहरातील कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या दहावर जावून पोहचली आहे. तर, तालुक्यातील कोरोना पॉजेटीव्ह रूग्णांची संख्या 48 वर जावून पोहचली आहे.  शहरात दररोज वाढणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे शहरवासीयांमध्ये काहीसे भितीचे वातावरण आहे.

काल (ता.6)पर्यंत सापडलेल्या कोरोना रूग्णांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचे आरोग्य विभागाने स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. काल रात्री उशीरा आलेल्या अहवालानुसार साखळकरवाडीतील त्या महिला रूग्णाच्या संपर्कातील एका खासगी डॉक्टरसह एकूण अठरा जणांचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यातच, कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेणारे तालुक्यातील दोन रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. हीच काहीशी बाब दिवसभराच्या धक्क्यानंतर राजापूरकरांना दिलासा देणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com