आत्महत्येसाठी गेलेल्या तरुणाच्या मागावर निघाली पोलिसांची तीन पथके, मग घडले असे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 जुलै 2020

भाऊ आत्महत्या करतो आहे, असे त्याने कळवल्याने तरुणीने पोलिसांची मदत मागितली.

दाभोळ (जि. रत्नागिरी) : आपल्या भावाने आत्महत्या करणार असल्याचा आपल्याला दूरध्वनी केला, अशी माहिती एका बहिणीने पोलिसांना दिली. ही माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक सासणे यांना देण्यात आली आणि मग मंगळवारी सुरू झाला एक पाठलाग. पोलिसांची तीन पथके त्या तरुणाच्या शोधासाठी बाहेर पडली.

भाऊ आत्महत्या करतो आहे, असे त्याने कळवल्याने तरुणीने पोलिसांची मदत मागितली. श्री. सासणे यांनी ही माहिती मिळताच तत्परतेने हालचाली सुरू केल्या. मिशन एकच होते त्या तरुणाला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे.

श्री. सासणे यांनी दापोलीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील तसेच दाभोळ सागरी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितले. हा युवक दाभोळ येथून त्याच्या वाहनाने दापोलीकडे जात असल्याचे सांगितले. राजेंद्र पाटील यांनी या युवकाच्या तपासासाठी तीन पथके तयार केली. एक पथक वाकवलीच्या दिशेने गेले, दुसरे पथक बुरोंडीमार्गे कोळथरेच्या बाजूला रवाना झाले, तर तिसरे पथक दाभोळमार्गे रवाना झाले. त्यांना नानटे या गावाजवळ ज्या वाहनाचा क्रमांक दिला होता, ते वाहन रस्त्याच्या बाजूला उभे असलेले दिसले. पाटील यांनी त्या वाहनाची पाहणी केली. तेव्हा त्यांना हवा असलेला युवकही आढळून आला. या युवकाला दापोली पोलिस ठाण्यात आणून समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. जिल्हा पोलिसांच्या तत्परतेमुळे त्या युवकाला आत्महत्येपासून परावृत्तही करण्यात आले अन्‌ बहिणीचा जीव भांड्यात पडला. 

शीघ्र कृतीबाबत पोलिसांचे कौतुक

जिल्ह्याबाहेरील हा युवक सध्या दापोली येथे राहात असून कौटुंबिक कटकटींनी कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. बहिणीला आज आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे बहिणीने पोलिसांची मदत घेतली. या तरुणाचे मोबाईल लोकेशन शोधून त्याला दापोली पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्रयत्नामुळे एका तरुणाचा जीव वाचल्याने दापोली पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले आहे. 

यांनी केली कामगिरी फत्ते

दापोली पोलिसांच्या पहिल्या पथकामध्ये पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, हवालदार संदीप गुजर, कॉन्स्टेबल सुनील पाटील, कोकणी, कांबळे तर दुसऱ्यामध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक शांताराम रहाटे, हवालदार दीपक गोरे तर तिसऱ्यामध्ये पोलिस उपनिरीक्षक कदम आदी होते. 

या युवकाचा शोध घेऊन त्याला दापोली पोलिस ठाण्यात आणले. त्याचे समुपदेशन करून त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. तो कोणताही अनुचित प्रकार करणार नाही, याची खात्री झाल्यावर या युवकाला त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले. 
- राजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक, दापोली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three squads of police followed the young man who had gone for suicide, then it happened