हर्णै-पाजपंढरीतील तीन पाणी नमुने आढळले दूषित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

रत्नागिरी - हर्णै-पाजपंढरीतील पसरलेली तापाची साथ दूषित पाण्यामुळे पसरल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून झालेल्या तपासणीतून पुढे आले आहे. येथील नळ-पाणी योजनेवरून घेण्यात आलेल्या ९ पैकी ३ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. हे पाणी कसे दूषित झाले, याचा शोध आरोग्य विभागाकडून सुरू झाला आहे.

रत्नागिरी - हर्णै-पाजपंढरीतील पसरलेली तापाची साथ दूषित पाण्यामुळे पसरल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून झालेल्या तपासणीतून पुढे आले आहे. येथील नळ-पाणी योजनेवरून घेण्यात आलेल्या ९ पैकी ३ पाण्याचे नमुने दूषित आढळून आले आहेत. हे पाणी कसे दूषित झाले, याचा शोध आरोग्य विभागाकडून सुरू झाला आहे.

हर्णे-पाजपंढरीत टायफॉईडचा प्रादुर्भाव झाल्याचे पुढे आले होते. हर्णैतील २२ आणि पाजपंढरीतील ३५ जणांना टायफॉईड झाला. तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात केलेल्या उपचारानंतर अनेक रुग्ण बरे झाले आहेत. साथीची कारणे शोधण्यासाठी मुख्य अणुजैविक शास्त्रज्ञ श्रीमती सुतारिया आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. आरोग्य विभागाकडून या परिसरात दोन आरोग्य पथकेही नेमण्यात आली आहेत. या आरोग्य पथकांकडून घरोघरी जाऊन आरोग्यविषयक जनजागृती करण्यात येत आहे. कुटुंबातील आजारी व्यक्‍तींची तपासणी करण्यात येत आहे. तसेच पिण्याच्या पाण्यात टाकण्यासाठी मेडिक्‍लोअरचे वाटपही 
करण्यात येत आहे. 

या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी धरणावरून योजना राबविण्यात आली आहे. धरणातील पाणी साठवण टाक्‍यात आणले जाते. तेथे ते पाणी शुद्धीकरण करुन घरोघरी वितरीत केले जाते. या योजनेतून वितरीत होण्याऱ्या पाण्याचे हर्णैतून २ व पाजपंढरीतून ९ नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील पाजपंढरीतील तीन नमुने दूषित आढळले आहेत. 

योग्य क्‍लोरीनीकरण झाले नसल्याने साथ
येथील टाकीतून सोडण्यात आलेल्या पाण्याचे योग्य क्‍लोरीनीकरण झाले नसल्याने तसेच हे पाणी प्यायल्याने ही साथ पसरली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. यातील कोणती कारणे जबाबदार आहेत, याचा शोध घेतला जाणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three water samples found contaminated in Harne Pajpandhari