esakal | आवाशीतील तीन तरुणांचा स्टार्टअप्‌ वाचतोय शेकडो लोकांचे प्राण

बोलून बातमी शोधा

आवाशीतील तीन तरुणांचा स्टार्टअप्‌ वाचतोय शेकडो लोकांचे प्राण
आवाशीतील तीन तरुणांचा स्टार्टअप्‌ वाचतोय शेकडो लोकांचे प्राण
sakal_logo
By
मुझफ्फर खाना

चिपळूण (रत्नागिरी) : येथील तीन तरुण उद्योजकांनी सुरू केलेल्या स्टार्टअपमुळे आज शेकडो लोकांचे प्राण वाचत आहेत. ऑक्‍सिजन बनवण्याचा प्लांट लोटे एमआयडीसीत सुरू केला तेव्हा हा प्राणवायू शेकडो कोरोना रुग्णांचे प्राण वाचवणारा ठरेल, अशी पुसटशी शंकाही त्यांना नव्हती; मात्र सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या क्रयोगॅस कंपनीत तयार होणारा ऑक्‍सिजन रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णालयांना पुरवला जात आहे.

विविध प्रकारच्या उद्योगात ब्लास्ट फर्नेस म्हणजे भट्टी चालवण्यासाठी ऑक्‍सिजनचा वापर होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगांची गरज ओळखून आवाशीतील सतीश आंब्रे, शेल्डीतील सचिन आंब्रे आणि लोटेतील सचिन चाळके या तिघा तरुणांनी जानेवारी 2020 मध्ये लोटे एमआयडीसीत ऑक्‍सिजननिर्मितीचा क्रयोगॅस हा प्रकल्प उभारला. हे तिघे लोटेतील एका कंपनीत कामाला होते. बॅंकेचे कर्ज आणि स्वःगुंतवणुकीचे नियोजन करून तीन कोटी त्यांनी गुंतवले. लोटेतील कारखानदार आणि जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांना ते ऑक्‍सिजनचा पुरवठा करत होते.

सुरवातीला शासकीय रुग्णालयांना फार कमी प्रामाणात ऑक्‍सिजन लागत होते. त्यामुळे उद्योगांना ऑक्‍सिजनचा पुरवठा करण्यावर या कंपनीचा भर होता; मात्र कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात बेड आणि ऑक्‍सिजन कमी पडू लागले. त्यानंतर या कंपनीने उद्योगांना ऑक्‍सिजन पुरवण्याचे बंद केले.

दिवसा दहा टन ऑक्‍सिजन तयार करून त्याचा पुरवठा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी सुरू झाला. ऑक्‍सिजन तयार करण्यासाठी लागणारे लिक्विड पूर्वीच्या कंपनीने बंद केल्यामुळे मध्यंतरी या कंपनीतून फार कमी प्रमाणात ऑक्‍सिजनचे उत्पादन होत होते; मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिंदल कंपनीकडून लिक्विड उपलब्ध करून दिले. ग्रामीण रुग्णालय, चिपळुणातील कामथे उपजिल्हा रुग्णालय, खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालय, दापोली, गुहागरसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना या कंपनीतून आता ऑक्‍सिजनचा पुरवठा केला जात आहे.

कोरोनाची लाट येईल आणि जिल्ह्यातील लोकांचे जीव वाचवण्यासाठी आमच्या कंपनीतील ऑक्‍सिजनचा वापर होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. स्वतः ऑक्‍सिजनचे छोटे-मोठे टॅंक भरून जिल्ह्यात पाठवण्याचे काम आम्ही तिघे करत आहोत.

- सतीश आंब्रे, लोटे

Edited By- Archana Banage