esakal | गावागावात रुग्णांत वाढ; सावंतवाडीत थम सिस्टीमची भिती
sakal

बोलून बातमी शोधा

गावागावात रुग्णांत वाढ; सावंतवाडीत थम सिस्टीमची भिती

गावागावात रुग्णांत वाढ; सावंतवाडीत थम सिस्टीमची भिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : गतवर्षी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून घेण्यात आलेली खबरदारी म्हणावी तशी सद्या दिसुन येत नाही. तालुक्‍यात शासकीय रेशन दुकानावर अद्यापही थम सिस्टिमनेच धान्य पुरवठा होत असल्याने कोरोनाचा संसर्ग अजुन वाढेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

गतवर्षी कोरोनाला रोखण्यासाठी शासनस्तरावरून पुरेपुर प्रयत्न करण्यात आले होते; मात्र गतवर्षी झालेले नियोजन यावर्षी मात्र दिसुन येत नसल्याने नागरिकांतुन नाराजी उपस्थित होत आहे. गतवर्षी गावागावात घेतलेली काळजी, कोरोनाला रोखण्यात यशस्वी झाली होती; मात्र आज त्याची पुनरावृत्ती पाहायला मिळत नाही. परिणामी कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असुन गावागावात रुग्ण आढळून येत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर सुरु असलेले मिनी लॉकडाऊन जाहीर करताना राज्य सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी मोफत धान्य पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत शासकीय रेशन दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. गतवर्षी कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणुन शासनाकडून थम सिस्टिम बंद करुन ऑफलाईन धान्यपुरवठा केला होता; मात्र आता कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत असतानाही ऑफलाईन धान्यपुरवठा देण्याबाबत शासनाकडून काहीच सुचना आम्हाला प्राप्त झाल्या नसल्याचे धान्य दुकानदाराकडून सांगण्यात येत आहे.

थम सिस्टिममुळे अनेकजण धान्य घेण्यासाठीही धजावत आहेत. शासनाने थम सिस्टिम बंद करुन ऑफलाईन धान्य पुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी सर्वसामान्य जनतेतुन होत आहे. धान्य वितरणाआधी संबंधीत रेशन धारकाला मशीनवर थम केल्यानंतरच धान्य पुरवठा केला जातो. तालुक्‍यात एकाच धान्य दुकानदाराकडे एक दोन गावाची धान्य वितरणाची जबाबदारी असते. त्यामुळेच विविध भागातून लोक धान्य नेण्यासाठी येत असतात. त्यामुळे एकमेकांपासून येथे कोरोना संसर्ग होण्याची शक्‍यता दाट आहे.

धान्यासाठी मोठी गर्दी

सद्या धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लोकांची मोठी गर्दी दुकानाबाहेर पाहायला मिळत आहे. यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. गतवर्षी प्रत्येक प्रभागाला दिवस ठरवुन धान्य वितरण केले जात होते. शिवाय सोशल डिस्टन, सॅनिटायझर आदी आवश्‍यक काळजी घेतली जात होती. आता या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे. सुशिक्षित नागरिकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून याबाबत प्रशासनाने गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

थम सिस्टीमबाबतचा आदेश केंद्राकडून होतो. तरीही रेशन दुकानदारांना सामाजिक अंतर, सॅनिटायझर वापरण्यासाठी सुचना करणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष वेधण्यात येईल.

- राजाराम म्हात्रे, तहसीलदार, सावंतवाडी

Edited By- Archana Banage

loading image
go to top