घोटगेवाडीत वाघाचा बछडा दिसल्याचा दावा

प्रभाकर धुरी
Thursday, 19 November 2020

परिसरात वाघाचे कुटुंब असण्याची शक्‍यता असल्याने पर्यावरणप्रेमींसाठी समाधानाची बाब आहे. 

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) - घोटगेवाडी येथे वाघाच्या बछड्याचे दर्शन घडले. शिवसेनेचे कोनाळ विभागप्रमुख संतोष मोर्ये आणि कांता गवस दोघेही मोर्लेतून पाळये तिठा येथे डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी जात असताना घोटगेवाडी येथील दाळोबा देवस्थानाजवळून खाली जंगल भागात तो पळाला. त्या परिसरात वाघाचे कुटुंब असण्याची शक्‍यता असल्याने पर्यावरणप्रेमींसाठी समाधानाची बाब आहे. 

घोटगेवाडीतील सगळा परिसर वनक्षेत्र आहे. काही दिवसांपुर्वी भटवाडी परिसरात एक बछडा तेथील वस्तीत आल्याचे काहींनी पाहिले होते; पण वनविभागाने तो बिबट्याचा बछडा असण्याची शक्‍यता व्यक्त केली होती. त्यानंतर पुन्हा नवा बछडा श्री. मोर्ये यांच्या दुचाकीसमोरून रस्ता पार करुन गेला. वेळ सायंकाळची असली तरी त्यांनी अगदी जवळून त्याला पाहिले. त्यांच्या म्हणण्यानुसार, बछडा आहे म्हणजे मादीही त्याच परिसरात असण्याची शक्‍यता आहे. तो सगळा परिसर जंगल आणि जैववैविद्यतेने समृद्ध आहे. 

परिसर पर्यावरणदृष्ट्या समृद्ध 
घोटगेवाडी, पाळये, मोर्ले, केर या परिसरात घनदाट जंगल आहे. तेथे अनेक वर्षे हत्तींचे वास्तव्य असायचे. आजही त्या परिसरात हत्तींची ये जा असते. साहजिकच वन्यप्राण्यांचा येण्याजाण्याचा मार्ग (कॉरिडॉर) आणि अधिवासाचे ठिकाण असल्याने तेथे अनेक वन्यप्राणी सहज दिसतात. वाघाचेही आता तेथे दर्शन घडल्याने तो परिसर पर्यावरणदृष्ट्या समृद्ध असल्याचे सिद्ध झाले आहे. 
 

दोडामार्ग घोटगेवाडी येथे यापुर्वीही वाघाचा बछडा पाहिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे होते; मात्र तो वाघाचा बछडा नसुन बिबट्याचा बछडा होता. वाघाच्या बछड्यासोबत 24 तास मादी असते. त्यामुळे कालच्या घटनेबाबत वनविभागाकडून खात्री करण्यात येईल. 
- गजानन पानपट्टे, वनक्षेत्रपाल दोडामार्ग 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tiger was spotted at Ghodgewadi in Sindhudurg district