

दाभिळ सरमळे येथे सातबांव हे धार्मिक ठिकाण आहे. नदीमध्ये नैसर्गिकरित्या तयार झालेली सात विवरे असून ती पाण्याने पूर्ण भरलेली असतात. याची खोली साधारण २० फुटांपर्यत आहे.
सावंतवाडीः तालुक्यातील दाभील सरमळे गावाच्या सीमेवरील दाट जंगल असलेल्या सातबांव या ठिकाणी नदीत असलेल्या देवकुंडात (नैसर्गिक विहीर) पट्टेरी वाघिणीचा सडलेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. पर्यावरण अभ्यासक प्रसाद गावडे आणि त्यांचे मित्र सचिन घाडी या भागात गेले असता काल (ता. २) उशिरा हा प्रकार उघड झाला. त्यांनी आज याबाबत वनविभागाला कल्पना दिल्यानंतर वनविभागाचे (Forest Department) उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी व पथकाने पंचनामा करून मृत वाघिणीला बाहेर काढले. जवळपास आठवड्यापूर्वी या ती विहिरीत पडून मृत झाली असावी, असा अंदाज पशुवैद्यकीय पथकाने व्यक्त केला.