तिलारी धरण धोक्यात?; पूर्वकल्पना न देता सोडले पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

तेरेखोल नदीची खोली वाढविणार
बांदा, शेर्ले, इन्सुली व आजूबाजूच्या परिसरात येणाऱ्या पुराचे पाणी लक्षात घेता तेरेखोल नदीपात्र खोल करणे आवश्‍यक आहे. याबाबत शासनाचे आपण लक्ष वेधले आहे. यातील तांत्रिक बाबी मिटल्यास आतील वाळू शासनाकडून काढून ती विकली जाणार आहे. त्यामुळे पुराचे पाणी बाजूच्या वस्तीत घुसणार नसल्याचे ते म्हणाले.

सावंतवाडी - जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे आतापर्यंत साडेतीनशे लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. दोडामार्गात दहा गावे पाण्याच्या वेढ्यात अडकली आहेत. जिल्ह्यात पूरजन्यस्थिती असताना दोडामार्ग तालुक्‍यात तिलारी प्रकल्पाचे पाणी कल्पना न देता सोडणाऱ्या व मदतकार्यात जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरलेल्या पाटबंधारे विभागाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याचा अहवाल तत्काळ देण्याच्या सूचना केल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

दरम्यान, पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रत्येक तालुक्‍याला बोटी देण्याबरोबरच वाहने खरेदी करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. साहित्य पंधरा दिवसांत उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री केसरकर यांनी जिल्ह्याच्या पूरस्थितीची आज पाहणी केली. यात त्यांनी प्रत्येक तालुक्‍याचा आढावा घेतला. याबाबतची माहिती त्यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. 

केसरकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात खारेपाटण, कुडाळ, बांदा, दोडामार्ग या भागात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले होते. या परिस्थितीत आपत्कालीनच्या काही बोटी देवगडमध्ये उपलब्ध असतानाही ते या भागात पोचू शकले नाही; मात्र असे असतानाही केंद्रीय आपत्कालीन पथकाची तुकडी मागविण्यात आली होती. ही पथके लोणावळा-रायगड येथेच अडकून पडली. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना आयत्या वेळी सांगूनही त्यांनी दोडामार्ग भागात तीन बोटी उपलब्ध करून दिल्या.’’ 

ते म्हणाले, ‘‘सावंतवाडी तालुक्‍यात बांदा शेर्ले, इन्सुली भागात मोठ्या प्रमाणात तेरेखोल नदीचे पाणी आल्याने त्याठिकाणी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र आपत्कालीन यंत्रणेने वाट न पाहता स्थानिक युवक व ग्रामस्थांनी केलेली मदत महत्त्वाची आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनीही या परिस्थितीत चांगले काम केले; मात्र अशा परिस्थितीत स्वतःची आपत्त्कालीन यंत्रणा असावी हे यामुळे शिकता आले. येत्या पंधरा दिवसांत प्रत्येक तालुक्‍यात आपत्कालीन यंत्रणा उभारली जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेल्या बोटी व वाहने खरेदी करण्यात येणार आहेत.

यामध्ये मोठ्या, लहान होड्यांचा समावेश असणार आहे. पूरस्थितीत ज्या घरातील भांडी व सामग्री वाहून गेली त्यांना तत्काळ शासकीय मदत म्हणून ३८०० रुपये देण्यात येणार आहे. भात पीक नुकसान याचा पंचनामाही तत्काळ करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.’’ दरम्यान, जिल्ह्यात पूरस्थिती पाहता दोडामार्गमध्ये पाटबंधारे विभाग आपली जबाबदारी पार पाडण्यात कमी पडला. तिलारी प्रकल्पाचे पाणी तेथील लोकांना कल्पना न देता सोडण्यात आले. त्यामुळे आज येथील दहा गावे पाण्याखाली आहेत.

याला जबाबदार असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी व्हावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. त्या ठिकाणी चार बोटी उपलब्ध असतानाही त्याचा वापर करून मदत का केली नाही, हा प्रश्न आहे. या सगळ्याची चौकशी होणार असल्याचे ते म्हणाले.

केसरकर म्हणाले, ‘‘सामाजिक संस्थांनी केलेली मदत लक्षात घेता त्यांनाही लवकरच साहित्य पुरविण्यात येणार आहे. मातीच्या घरांना नुकसानभरपाई मिळावी, याबाबत वेगळा निकष लावावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. दोन दिवसांत पूर्ण जिल्ह्याचा दौरा करणार असून नुकसानभरपाई लवकर देण्याचे आपले प्रयत्न राहणार आहेत. जिल्ह्यात पावसाळ्यात पुराच्या पाण्यात धोकादायक ठरणाऱ्या नद्याच्या काठावरील गावाची यादी तयार करण्यात येणार आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tilari Project Water Officer Inquiry Order Deepak Kesarkar