Ratnagiri Dam Mishap : महिन्याभरातच तिवरे गाव पुन्हा उभे राहतयं

मुझफ्फर खान
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

चिपळूण - तिवरेवासीयांसाठी त्या दिवशी सूर्योदय झालाच नाही. रात्री घडलेल्या विध्वंसकारी नैसर्गिक आपत्तीने तिवरेवासीयांच्या आयुष्यात काळोख निर्माण झाला. या घटनेला आज महिना झाला. गाव कायमचे लुप्त होते की काय, अशी शंका मनाला चाटून गेली; परंतु महिन्याभरातच हे गाव पुन्हा उभे राहते आहे. 

चिपळूण - तिवरेवासीयांसाठी त्या दिवशी सूर्योदय झालाच नाही. रात्री घडलेल्या विध्वंसकारी नैसर्गिक आपत्तीने तिवरेवासीयांच्या आयुष्यात काळोख निर्माण झाला. या घटनेला आज महिना झाला. गाव कायमचे लुप्त होते की काय, अशी शंका मनाला चाटून गेली; परंतु महिन्याभरातच हे गाव पुन्हा उभे राहते आहे. अंगावर जुन्या जखमा आहेतच; मात्र त्याला कुरवाळत बसण्यापेक्षा त्यातून मन घट्ट करण्याचा संदेश घेत आपत्तीतून बचावलेले तिवरेवासीय आयुष्याच्या वाटेवर चालत आहेत. भग्न मने उभी करण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे.

महसूल विभाग, स्वयंसेवी संस्था आणि इतर अनेक घटकांच्या अथक प्रयत्नामुळे हे अशक्‍यप्राय वाटणारे आव्हान पेलले आहे. डोंगराच्या कुशीत वसलेल्या तिवरे गावातील धरण २ जुलैला फुटले. १२ घरांसह २१ जण वाहून गेले. यातील काही कुटुंबात एकही माणूस शिल्लक राहिला नाही. तर काहींची मुले आणि संसार उघड्यावर आली. यातील १७ जणांना शासनाकडून प्रत्येकी चार लाखांप्रमाणे तातडीची मदत केली. उर्वरित चौघांचे वारसदार तपासून त्यांनाही मदत दिली जाणार आहे.

काही आपद्‌ग्रस्तांचे अलोरेमध्ये तर काहींचे तिवरे गावातील सुरक्षित जागेत स्थलांतर केले जाणार आहे. दोन दिवसात पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. भेंदवाडी, फणसवाडी, हेलनवाडी, कुंभारवाडी, गावठाण, कातकरवाडी, बौद्धवाडी, चर्मकारवाडी या आपद्‌ग्रस्त वाड्या आहेत. तिवरे गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत शुद्धीकरणाचे काम सुरू आहे. टॅंकर तसेच टाक्‍यातील पाण्याचे शुद्धीकरण केले जात आहे. सार्वजनिक व डुरेतील पाण्याचे नमुने तपासले जात आहेत. 

दुर्घटनेमध्ये महावितरणचे ७ लाख ५३ हजार रुपयांचे नुकसान झाले. महावितरणने ७२ तासांत गावातील वीजपुरवठा सुरळीत केला. सार्वजनिक पथदीप आणि ज्या ठिकाणी नागरिकांचे तात्पुरते पुनर्वसन केले जाणार आहे. त्याठिकाणी वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरू आहेत.

तात्पुरत्या पाणी योजनेसाठी प्रयत्न तिवरे गावाला टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तहसीलदारांनी पाणी साठवण्यासाठी सहा वाड्यांमध्ये लोकसहभागातून टाक्‍या उपलब्ध करून दिल्या आहेत. तात्पुरत्या पाणी योजनेसाठी ३१०० मीटर पाईप, केबल आणि पंप लागणार आहेत. त्यासाठी ५ लाख ३२ हजार रुपयाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. ज्या डुऱ्यातून पाणी उचलले जाणार आहे. तेथील गाळ उपसणे आणि डुऱ्याची खोली वाढवण्याचे काम लोकसहभागातून सुरू आहे. 

गुरांचे स्थलांतर गोशाळेत 
गावात अनेक गुरे बेवारस झाली आहेत. काहींचे मालक आहेत पण गुरे बांधण्यासाठी गोठे नाहीत. ती व्यवस्था होईपर्यंत गुरांचे लोटे येथील गोशाळेत स्थलांतर केले आहे. स्थलांतरापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी व टॅग लावण्याचे काम सुरू आहे. गाव उभे राहिल्यानंतर तेथील पशुधन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना तहसीलदार देसाई यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

तहसीलदार लोकसहभाग आणि सीएसआरमधून आपद्‌ग्रस्तांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू उपलब्ध करून देत आहेत. शासकीय अधिकारी कामांचे अंदाजपत्रक तयार करत आहेत. शासनाने निधीच दिला नाही तर या अंदाजपत्रकाचा उपयोग नाही. गावातील अंतर्गत सुविधा पुरवण्यासाठी निधीची गरज आहे. हा निधी पॅकेज स्वरूपात मिळावा अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. मोरेवाडीचा पूर्णपणे संपर्क तुटला आहे. रस्ता होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात रोपवे पद्धतीचा िब्रज उभारण्यात यावा. 
- सुरेश धनावडे
, तिवरे फणसवाडी

रस्ते, साकव, कॉजवेसाठी हवे दहा कोटी
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून गावातील वाहून गेलेले साकव, रस्ते, कॉजवे बांधण्यासाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी सुमारे दहा कोटींचा निधी अपेक्षित आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या यंत्रणेच्या माध्यमातून तात्पुरते रस्ते तयार केले जात आहे. भेंदवाडी, फणसवाडी रस्त्याचा प्रस्ताव तयार केला आहे. 

जमिनीची सुपीकता वाढवण्याकडे लक्ष
गावातील भातशेती, फळपिकांचे नुकसान झाले आहे. शेत जमिनीमध्ये गाळ साचला आहे. तसेच सुपीक जमीन खरडून गेली आहे. गावाला नुकसान भरपाई देण्याबरोबर जमीन सुपीक बनविण्यासाठी कृषी विभागाकडून आराखडा तयार केला जात आहे. त्यासाठी २५ ऑक्‍टोबर २००५ च्या शासन निर्णयाचा आधार घेऊन तिवरे गावासाठी विशेष बाब म्हणून निधी देण्याची मागणी कृषी विभागाकडून केली जाणार आहे.  

धरण फुटीच्या भीषण आपत्तीतून बचावलेल्या नागरिकांच्या मनामध्ये खोलवर जखम झाली आहे. दुर्घटनेनंतर तेथील परिस्थिती पूर्वपदावर आणणे हे पहिले आव्हान होते तर दुसरे आव्हान पुनर्वसनाचे आहे. त्यांना घरे तर दिली जाणारच; परंतु भग्न मने उभी करण्याचे सर्वांत मोठे आव्हान आहे. महसूल कर्मचारी, स्वयंसेवी संस्था व गावातील नागरिकांनी साथ दिली. त्यामुळे तिवरे गावाला पुन्हा उभारी देण्याचे काम सुरू केले आहे.
- जीवन देसाई,
तहसीलदार 

प्रत्येक गावाची एक परिसंस्था असते. तिला धक्का लागला तर त्याचे गावपण संपते. तिवरे पुन्हा उभे करताना त्याची इकोसिस्टीम तशीच राहील याची पूर्णतः काळजी घेतली जात आहे. मागणीनुसार पुनर्वसन केले जाणार आहे; परंतु मानसिक पुनर्वसन आणि तेथील स्थानिक अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देणे हे मोठे आव्हान आहे.
- तानाजी शेजाळ,
नायब तहसीलदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tivare Dam incidence redevelopment work The big challenge