Ratnagiri Dam Mishap : तिवरेच्या पाण्याने सात गावे गेली वाहून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जुलै 2019

चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे-खडपोली धरण भरून वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला.

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याने धरणाच्या खालील भागात असलेल्या ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांना थेट फटका बसला. या गावांमध्ये पाणी घुसले असून, एनडीआरएफच्या जवानांकडून मदत होत आहे.

चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत असून रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास प्रथम तिवरे-खडपोली धरण भरून वाहू लागलं. त्यानंतर धरणाला भगदाड पडत असल्याचे लक्षात आल्याने स्थानिक तलाठ्यांनी गावकऱ्यांना खबरदारीचा इशारा दिला. त्यानंतर तासाभरातच धरण फुटून धरणाखाली येणाऱ्या गावांमध्ये पाणी घुसले आणि हाहाकार उडाला. 23 जण वाहून गेल्याची शक्यता असून, तीन मृतदेह हाती लागले आहेत.

ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे. यात किमान 23 ग्रामस्थ वाहून गेल्याची भीती आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली. स्थानिकांशी संपर्क साधला असता त्यांनी किमान 23 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली आहे. पाण्याचा प्रचंड वेग असल्याने काही घरेही वाहून गेल्याची भीती आहे. ज्या गावांमध्ये धरणाचे पाणी शिरले आहे त्या गावांत सुमारे 3 हजार इतकी लोकवस्ती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tiware Dam in Tehsil Chiplun of Ratnagiri district has breached causing flood like situation