
चिपळूण - नवीन वर्षात चिपळूण तालुका पाणीटंचाईतून मुक्त
नवीन वर्षात चिपळूण तालुका पाणीटंचाईमुक्त
जलजीवन मिशन ; १६२ गावात पाणीयोजना सुरू
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत चिपळूण तालुक्यातील १६२ गावांमध्ये नवीन पाणीयोजनेचे काम सुरू झाले आहे. नवीन वर्षांत या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर शासनाचा भर आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी होणाऱ्या यातनेतून नवीन वर्षात सुटका होणार आहे.
ग्रामीण भागामध्ये शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जलजीवन मिशन हाती घेण्यात आले आहे. २०२४ पर्यंत ''हर घर नलसे जल'' हा मानस डोळ्यासमोर ठेवण्यात आला आहे. या योजनेसाठी केंद्रशासन ५० टक्के, राज्यशासन ५० टक्के आणि १० टक्के लोकवर्गणी अशी निधीची उपलब्धता राहणार आहे. योजना पूर्ण झाल्यावर ती यशस्वीपणे चालवल्यास आणि देखभाल दुरुस्ती योग्य रितीने केल्यास ग्रामपंचायतीला योजनेच्या एकूण खर्चाच्या १० टक्के रक्कम प्रोत्साहन बक्षीस म्हणून देण्याची यात तरतूद आहे.
चिपळूण तालुक्यातील अनारी, कुडप, येगाव, रिक्टोली, अडरे, खडपोली, गाणे, कोंडमळा, तिवडी, कादवड, नांदगाव, सावर्डे, ओवळी, टेरव, शिरवली, येलोंदवाडी, गुंढे, डेरवण, तळसर ही गावे टंचाईग्रस्त गावे म्हणून प्रसिद्ध आहेत. या गावातील धनगरवाड्यांना उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो.
यावर्षी नेहमीच्या टंचाईग्रस्त गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचलेली नाही. जिल्हा परिषदेचा टंचाई आराखडाही अजून तयार झालेला नाही. ग्रामीण भागातून अजूनतरी टॅंकरची मागणी सुरू झालेली नाही; मात्र उन्हाळा वाढेल तशी टंचाई वाढण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी जलजीवन मिशनमध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या यंत्रणा काम करत आहेत. नवीन प्रस्तावित योजना व रेट्रोफिटिंग (अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये सुधारणा) अशा स्वरूपात तालुक्यातील १६२ गावांमध्ये पाणीयोजनेचे काम सुरू आहे. यातील २५ गावांची योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू आहे. १३७ गावांची पाणीयोजना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू आहे.
---------
कोट
चिपऴूण तालुक्यात १३१ योजनांचा प्रस्ताव आहे. यातील १३० योजनांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहेत. ११७ योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ८० योजनांसाठी ठेकेदारांना कामाचे आदेश देण्यात आले आहेत. ४५ योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. ५ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत ५ कोटी १५ लाखाचा निधी योजनेवर खर्च झाला आहे.
- अविनाश जाधव, उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चिपळूण