
शिक्षक समितीतर्फे विविध उपक्रम
शिक्षक समितीतर्फे विविध उपक्रम
तळेरे : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन ३ जानेवारी हा बालिकादिन म्हणून साजरा होतो. यानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडी आपल्या विविध उपक्रमांचा प्रारंभ करणार आहे. या उपक्रमांत दर दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये प्राथमिक शिक्षक समितीच्या तालुका महिला आघाडीतर्फे तालुक्याचे एक उत्कृष्ट सादरीकरण व्हिडीओच्या माध्यमातून प्रसारित केले जाणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे आठही तालुक्यांचे सादरीकरण साचेबंद न राहता वेगवेगळे असणार आहे. प्रत्येक तालुक्यातील बालिका आपली कला सादर करणार आहेत. या नववर्षातील नव्या कल्पनेसह येणाऱ्या उपक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा निकिता ठाकूर, जिल्हा सरचिटणीस वैभवी कसालकर यांनी केले आहे.
--
देवगडमध्ये गुरुवारी रेकॉर्ड डान्स स्पर्धा
देवगड ः जामसंडे येथील साई कॉम्लेक्स व्यापारी मित्रमंडळाच्यावतीने गुरुवारी (ता. ५) धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने तालुकास्तरीय खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. यातील पाहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे ३०००, २००० व १००० रुपये रोख बक्षीस आणि प्रत्येकी चषक तसेच दोन उत्तेजनार्थसाठी प्रत्येकी ५०० रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. याबरोबरच स्पर्धेतील १२ वर्षांखालील लहान मुलांमधील उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या स्पर्धकाला बक्षीस दिले जाणार आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. इच्छुकांनी उद्यापर्यंत (ता. २) संकेत चव्हाण, राजा चिंदरकर किंवा आदित्य पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.