342 रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा आजारी

342 रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा आजारी

Published on

३४२ रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा आजारी

ग्रामीण भागात सर्वाधिक झळ ; पर्याय अपुरे

अशी आहेत रिक्त पद
------------------
*आरोग्य सेविका-२२७
*आरोग्य सेवक-७६
*औषध निर्माता-३७
*आरोग्य पर्यवेक्षक-२
*एकूण ३४२ पदे रिक्त

रत्नागिरी, ता. १ : कोरोनाच्या महामारीत नागरिकांचे आरोग्य ज्या विभागाच्या हातात होते तोच आरोग्य विभाग कर्मचार्‍यांच्या रिक्त पदांचा ताप सहन करत आहे. सध्या कोरोनाची चाहूल लागलेली असतानाच त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाकडे सैनिकच नसल्याचे दिसून येत आहे. जवळपास ४० टक्के पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आजारी पडली आहे. सध्या आरोग्य सेविकांसह ३४२ पदे रिक्त आहेत.
चीनसह ब्राझील, अमेरिका आदी देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. भारतात संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये बुस्टर डोस तसेच नेझल व्हॅक्सिन यांचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात कोरोना नसला तरी आरोग्य यंत्रणा पुढे कोरोना वाढला तर अलर्ट झाली आहे. असे असले तरी कोरोनाशी लढा देण्यासाठी आरोग्य विभागाकडे सैनिकच नसल्याचे दिसून आले आहे. आरोग्यसेविका तब्बल २२७ पदे रिक्त आहेत. यामुळे ग्रामीण भागात देणार्‍या आरोग्य विभागाला तारेवरची कसरत करावी लागते.
ग्रामीण तसेच दुर्गम भागातील गरीब रुग्णांसाठी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचाच आधार असतो. त्याठिकाणीच त्यांच्यावर उपचार होत असतात. ग्रामीण भागात आरोग्याची सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या कमी असल्याने आरोग्य विभागच सलाईनवर गेला आहे.सार्वजनिक लसीकरणासाठी नागरिकांना या आरोग्य यंत्रणेशिवाय अन्य पर्याय नाही. आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे ग्रामीण आरोग्यसेवा अनुया मनुष्यबळामुळे आजारी पडली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील कार्यरत असणारे कर्मचारी शक्य त्या पद्धतीने आरोग्याचा गाडा ओढत आहेत. रिक्त पदांमुळे कार्यरत कर्मचार्‍यावर कामाचा अतिरिक्त ताण वाढत आहे. ग्रामीण भागातील अशी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील रिक्त जागा भरण्यात याव्यात, मागणी होत आहे.
-----------------
चौकट
आरोग्य कर्मचाऱ्यांची कामे

नियमित बीसीजी, गोवर, हिपॅटायटिस बी, पोलिओ, डांग्या खोकला, घटसर्प, जीवनसत्व अ, जंतनाशक मोहीम, कोविड, राष्ट्रीय कार्यक्रम, कुटुंब कल्याण, शालेय आरोग्य तपासणी, अंगणवाडी, गरोदर माता, आरोग्यमंत्री यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ’माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान, क्षयरोग, कुष्ठरोगीची नियमित तपासणी, असंसर्ग आजाराच्या तपासण्या, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे लसीकरण, विविध आजारांची नोंद व औषधोपचार, रोगप्रतिबंधक कामे, आरोग्य विषयक जनजागृती, आरोग्य शिक्षण, आरोग्य विभागाच्या विविध योजना तळागाळात पोहोचवणे. याबरोबरच या केंद्रामध्ये विविध आजारांची नियमित तपासणी आणि औषधोपचार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com