
गुहागर ःबाग किनारी ग्रामस्थांनी रोखली वाळू वाहतूक
पान 1
73522
73523
अवैध वाळू उपशाविरुद्ध ग्रामस्थ आक्रमक
---
गुहागर बाग किनारी रोखली वाहतूक; दमदाटीमुळे पोलिसांना केले पाचारण
गुहागर, ता. ५ ः गुहागर बाग समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला प्रतिबंध करण्याला आता नागरिकच सरसावले आहेत. काल (ता. ४) सकाळी गुहागर शहर बाग परिसरात समुद्राची पांढरी वाळू भरून वाहतूक करणारे वाहन आरे येथील काही ग्रामस्थांनी अडवून अवैध वाळू उपसा व वाहतूक महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामस्थांनी अवैध वाळू उपशाचे वाहन पकडून दिल्याने वाहनावर नाइलाजाने कारवाई करण्याची महसूल विभागावर वेळ आली आहे. ग्रामस्थांनी वाहतूक रोखल्यावर वाळू व्यावसायिकांचे अनेक सहकारी दमदाटी करण्यासाठी उपस्थित झाले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले.
गुहागर बाग समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू उपसा सुरू आहे. पालशेत आणि वरचापाट बाग परिसरात अशा प्रकारची चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. गुहागर बाग समुद्रकिनारी गेले अनेक महिने या बेसुमार होणाऱ्या वाळू उपशाकडे महसूल विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत होता. याबाबत आश्चर्य व्यक्त होत होते. मात्र, काल पकडलेल्या या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभाग कशाप्रकारे कारवाई करते, याकडे लक्ष आहे. कारवाईच्या प्राथमिक अवस्थेत संबंधित व्यक्तीला दंडाची नोटीस बजावल्याचे तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी सांगितले.
या समुद्रकिनारी चालणाऱ्या वाळू उपशाकडे वेळीच नियंत्रण न केल्यास अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्रकिनाऱ्यावरील या वाळू उपशावर काहींनी आपलीच मालमत्ता असल्यासारखे अधिकार गाजवायला सुरुवात केली आहे. वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे पालशेत येथे ग्रामपंचायत सदस्याला मारहाण झाली, त्याप्रमाणे गुहागरातही वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या उपशासाठी जुनी आणि विना नंबरप्लेट वापरली जात असल्याचे निदर्शनास आले. आरे येथे ग्रामस्थांनी वाहतूक रोखल्यावर वाळू व्यावसायिकांनी दमदाटी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून आरे वाकी पिंपळवट विविध कार्यकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप ऊर्फ भय्या देवकर यांनी पोलिस प्रशासनाला संपर्क साधला. पोलिस घटनास्थळी येताच वाळू व्यावसायिक घटनास्थळावरून निघून गेले.
वाहनचालकाला दंड
वाहनासह वाळू प्रशासनाने जप्त केली असून, आठ हजार १०० रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. ग्रामस्थ आणि पोलिसांनी वाळू वाहतुकीचे वाहन अडविल्याची माहिती महसूल विभागाला दिली. महसूल विभागाने वाळूसह वाहन जप्त केले. वाहनचालकाला पाऊण ब्रास वाळूवरील दंडात्मक कारवाई करीत आठ हजार १०० रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे. दंड भरून झाल्यावर पावतीसह उपविभागीय अधिकारी, चिपळूण यांच्याकडे संबंधितांना पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.