''मोपा''वरुन उड्डाणे सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''मोपा''वरुन उड्डाणे सुरु
''मोपा''वरुन उड्डाणे सुरु

''मोपा''वरुन उड्डाणे सुरु

sakal_logo
By

73548
मोपा ः येथील मनोहर विमानतळावर गुरुवारी उतरलेले पहिले विमान.
73549
मोपा ः पहिल्या प्रवशाला बोर्डिंग पास देताना केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक.

73551
मोपा ः विमानतळावर झालेली प्रवाशांची गर्दी. (छायाचित्रे ः नीलेश मोरजकर)

''मोपा''वरून उड्डाणे सुरू
दिवसभरात ११ विमाने; केंद्रीय मंत्री राणेंचेही आगमन

नीलेश मोरजकर ः सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ५ ः मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून उड्डाणे सुरू झाली. सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी हैदराबादहून आलेले इंडिगोचे पहिले विमान येथे उतरले. दिवसभरात ११ विमाने उतरली. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक व गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी हैदराबादला जाणाऱ्या पहिल्या प्रवाशाला बोर्डिंग पास दिला. केंद्रीय लघु व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे दुपारी विमानतळावर उतरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले.
टॅक्सी व्यावसायिकांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. ४) रात्री उशिरा मोपा परिसरात जमावबंदी लागू करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, यासाठी मोपाच्या आवारात कडक बंदोबस्त होता. मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, जयपूर, पुणे, अहमदाबाद व चेन्नई या शहरांमध्ये आजपासून मोपावरून विमानसेवा सुरू झाली आहे. विमानतळावर इंडिगो, गो फर्स्ट, विस्तारा व आकासा विमान कंपन्यांनी काउंटर उभे केले आहे. येथे उतरणाऱ्या प्रवाशांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यामुळे पर्यटक देखील भारावून गेले. गोवा दर्शनासाठी आलेल्या काही पर्यटकांनी बॅण्डच्या तालावर ठेका धरत नृत्यही सादर केले. विमानतळावर पहिल्याच दिवशी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरण होते. मोपावर उतरणाऱ्या प्रवाशांना सरकारच्या गोवा टॅक्सी अॅपद्वारे टॅक्सी आरक्षित करता येईल, तसेच ब्ल्यू कॅबही येथे सुरू होणार आहे.
''दाबोळी''च्या तुलनेत मोपावरील विमानांची तिकिटे महाग असल्याचे आज पहिल्याच दिवशी निदर्शनास आले. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने २५ ते ७५ टक्के अतिरिक्त भाडे प्रवाशांना याठिकाणी मोजावे लागणार आहे. देशी प्रवाशांना अतिरिक्त ४५० रुपये तर विदेशी प्रवाशांना १ हजार १०० रुपये ज्यादा शुल्क आकारले जात आहे. हा विमानतळ जीएमआर इंटरनॅशनल, गोवा या कंपनीने बांधला आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी दोन हजार ८७० कोटी रुपये खर्च झाला आहे. त्यामुळेच या विमानतळातील प्रवासी सेवा शुल्क हे अतिरिक्त ठेवण्यात आले आहे.
मोपा विमानतळावर प्रथम इंडिगो कंपनीचे विमान उतरले. याचा फ्लाइट क्रमांक ६ ई ६१४५ हैद्राबाद-गोवा असल्याची माहिती जीएमआर कंपनीने दिली. प्रवाशांच्या सेवेसाठी कदंबच्या विशेष लक्झरी बसेससह टॅक्सी सेवाही उपलब्ध होती.
मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी सर्वानुमते घेण्यात आला होता. डिसेंबरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आलेल्या गोव्यातील या दुसऱ्या विमानतळाचे नाव मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे दिले असले तरी तसे अधिकृतरीत्या आज निश्चित करण्यात आले. त्यामुळे वेळापत्रकात मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा असे सूचित करण्यात आले होते.

अनेकांनी घेतला पहिल्या सफरीचा आनंद
विमानतळ प्रत्यक्ष सुरु झाल्याने आज अनेकांनी पहिल्या सफरीचा आनंद घेतला. मोपा ते मुंबई या विमान फेरीला प्रवाशांनी सर्वाधिक पसंती दिली. अनेकांनी या आठवणी आपल्या कॅमेऱ्यात कैद केल्या.

सिंधुदुर्गसाठी फायदेशीर ः राणे
मोपा विमानतळवार आज केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे दुपारी आगमन झाले. या वेळी त्यांनी मोपा विमानतळ गोव्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याला फायदेशीर असल्याचे सांगितले. याचा फायदा येथील पर्यटन वाढीसाठी निश्चितच होणार आहे, असेही ते म्हणाले.