पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ
पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ

पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ

sakal_logo
By

73601
कणकवली : येथील पर्यटन महोत्‍सवात बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे. बाजूला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, संदेश सावंत, समीर नलावडे, बंडू हर्णे आदी. (छायाचित्र : प्रथमेश जाधव)


पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ

केंद्रीय मंत्री राणे : कणकवली पर्यटन महोत्‍सवाचे उद्‌घाटन

कणकवली, ता.६ : भातशेती आणि मासेमारी एवढेच उत्पन्नाचे स्त्रोत असणाऱ्या गोव राज्‍याने केवळ पर्यटनाच्या माध्यमातून सर्वाधिक दरडोई उत्पन्न निर्माण केले आहे. त्‍याच धर्तीवर सिंधुदुर्गातही पर्यटन वाढण्यासाठी आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
कणकवली पर्यटन महोत्‍सवाचा शुभारंभ शहरातील उपजिल्‍हा रूग्‍णालयासमोरील पटांगणात झाला. यावेळी श्री.राणे बोलत होते. या महोत्‍सवाला राज्‍याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्‍हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, संदेश उर्फ गोट्या सावंत, रोटरी क्‍लबचे गौरेश धोंड आदी उपस्थित होते.
राणे म्‍हणाले, गोवा राज्‍याचे दरडोई उत्पन्न साडे चार लाख रूपये आहे तर आपल्‍या जिल्ह्याचे सव्वा दोन लाख रूपये आहे. त्‍यामुळे आपणही गोवा राज्‍याच्या धर्तीवर दरडोई उत्पन्न वाढवू शकतो. त्‍यासाठी इथल्‍या तरूणांनी व्यावसायिक आणि उद्योगाकडे वळायला हवे. केंद्राच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून आम्‍ही सर्व ते मार्गदर्शन देण्यास तयार आहोत. त्‍यामुळे आता तरूणांनी उद्योजक होण्यासाठी पुढे यायला हवे.
राणे म्‍हणाले, आज आमच्यावर सर्वजण टीका करत आहोत. तर राणेवर टीका झाली की लगेच त्‍याची ब्रेकिंग न्युज होते. पण माझ्यावर किंवा माझ्या सहकाऱ्यांवर होणाऱ्या टीकेला कुणी उत्तर देऊ नये. तर जनतेची कामे करावीत. जनतेचा आशीर्वाद हा आमच्यासाठी महत्‍वाचा आहे. दरम्‍यान आमच्यावर टीका झालेली कात्रणे आम्‍ही जपून ठेवली आहेत. त्‍यावर न्यायालयात जाऊन आम्‍ही दाद मागणार आहोत. नगराध्यक्ष समीर नलावडे म्‍हणाले, कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षे पर्यटन महोत्‍सव होऊ शकला नाही. यापूर्वी २०२० मध्ये पर्यटन महोत्‍सव आम्‍ही केला होता. त्‍यावेळी सहा कोटींची उलाढाल झाली होती. नवी पिढी उद्योजक व्हावी हा देखील पर्यटन महोत्‍सव आयोजनामागील आमचा हेतू आहे. उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आभार मानले.
मान्यवरांचा सत्‍कार
कोरोना कालावधीत आपल्‍या जीवाची पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या अशोक राणे, अरूण जोगळे, उत्तम पुजारे, निनाद पारकर, अमित टकले. डॉ.सुहास पावसकर, शिवाजी परब, डॉ.संजय पोळ, अधिपरिचारिका नयना मुसळे, आरोग्‍य सहाय्यक प्रशांत बुचडे, विशाल मेस्त्री, संविता आश्रमचे संदीप परब आदींचा सत्‍कार यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला.
--
तरुणांचे स्थलांतर थांबवण्यासाठी प्रयत्न
पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्‍हणाले, इथल्‍या तरूणांचे मुंबई व इतर शहरात रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आम्‍ही प्रयत्‍न करत आहोत. केंद्रीय नारायण राणे यांच्यामुळे सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्‍हा झाला आणि इथल्‍या पर्यटन विकासाला चालना मिळाली. त्‍या माध्यमातून जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढले. आता आगामी काळातही जिल्ह्यातील प्रत्‍येकी व्यक्‍ती सक्षम व्हावा. इथे उद्योजक व्हावेत, शेतकऱ्यांना पूरक उद्योगधंदे करता यावेत यासाठी आम्‍ही प्रयत्‍न करत आहोत. राणे यांच्या प्रयत्‍नामुळे मालवण ते तारकर्ली पर्यटन हब बनला. आता विजयदुर्ग ते शिरोड्यापर्यंत पर्यटक येऊ लागले आहेत.