वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरावर मोर्चा
वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरावर मोर्चा

वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरावर मोर्चा

sakal_logo
By

73912
सावंतवाडी ः पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश राऊळ. सोबत चंद्रकांत कासार व अन्य.

वेळप्रसंगी मंत्र्यांच्या घरावर मोर्चा

रुपेश राऊळ यांचा इशारा; निवडणुकीवेळच्या वचनांचा सत्ताधाऱ्यांना विसर

सावंतवाडी, ता. ७ ः जिल्ह्यातील सत्ताधाऱ्यांनी आजपर्यंत विकासाच्या मुद्यावर मते मागितली; मात्र येथील बेरोजगारीबरोबर लोकांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. त्यांना मतदारांना दिलेल्या आश्वासनांचा आणि वचनांचा विसर पडला आहे. त्यामुळे त्यांना आठवण करून देण्यासाठी येणाऱ्या काळात शिवसेना पक्षातर्फे मंत्र्यांच्या घरांवर मोर्चे काढू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःच्या विकासासाठी मंत्रिपद घेतले आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीच पडलेले नाही, अशीही टीका राऊळ यांनी यावेळी केली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, विनोद ठाकूर, श्रुतिका दळवी आदी उपस्थित होते. खासगी कंपनीतर्फे गुरुवारी येथे रोजगार मेळावा झाला होता. याला मोठी गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर राऊळ पुढे म्हणाले, ‘‘सावंतवाडीत येऊन एखाद्या खासगी एजन्सीला रोजगार मेळावा आयोजित करावा लागतो, हे येथील केंद्रीय मंत्री आणि कोकणातील उद्योग मंत्र्यांचे अपयश आहे. येथील राज्यकर्ते मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करून शकले नाहीत आणि येथील जनतेचा विकास करू शकलो नाही, हे आता येथील नेत्यांनी आणि मंत्र्यांनी मान्य केले पाहिजे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शालेय शिक्षणमंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर यांचे हे अपयश आहे. रोजगाराच्या स्थानिक संधी नसल्याने या ठिकाणच्या युवक-युवती बाजूलाच असलेल्या गोव्यात नोकरीसाठी जात आहेत; मात्र दुर्दैवाने जात-येत असताना काहींना अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. राज्याचा विकास आम्हीच करू, असे सांगणाऱ्या केसरकर, राणे आणि चव्हाण यांनी सहा महिने झाले तरी एकही प्रकल्प का आणू शकलो नाही, याचे आत्मपरीक्षण करावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य, पर्यटन, शिक्षण, रोजगार या कुठल्याही प्रश्नात प्रगती होताना दिसत नाही; मात्र अधोगती होतानाची उदाहरणे समोर येत आहे. याला जबाबदार राज्यकर्तेच आहेत. या ठिकाणी मंत्री असताना त्यांनी जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी रोजगार आणले पाहिजे होते; परंतु दुर्दैवाने ते झाले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.’’
---
स्वार्थापोटीच केसरकर शिंदे गटात
राऊळ म्हणाले, ‘‘मंत्रिपद मिळाले नसल्याने काही करू शकलो नाही, असे केसरकर यांनी वारंवार सांगितले होते; मात्र त्यांच्याकडे आता मंत्रिपद आहे. तरीही ते रोजगाराचा प्रश्न का सोडवू शकत नाहीत? खासगी कंपन्यांचा आधार त्यांना का घ्यावा लागतो? शिंदे गटात जाताना येथील जिल्ह्याचा विकास होण्यासाठी मी शिंदे गटात जात आहे, असे केसरकरांनी सांगितले होते; मात्र ते विकासाच्या मुद्यावर नाही, तर स्वतःच्या स्वार्थासाठी गेले हे आज सिद्ध होत आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांचे काहीच पडलेले नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी हे मंत्रिपद आहे; मात्र येथील जनता सुज्ञ आहे. अशा प्रकारच्या घटना होत राहिल्या तर शिवसेनाही गप्प बसणार नाही.’’