सहलींसाठी देवगडाला उच्चांकी पसंती
swt१२१५.jpg
७५०३९
देवगडः तालुक्यात कातळशिल्प पाहण्यासाठी पर्यटकांना वाढता ओढा.
सहलींसाठी देवगडाला उच्चांकी पसंती
पर्यटन स्थळे गजबजलीः कातळशिल्प पाहाण्याकडे पर्यंटकांचा ओढा
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १२ ः मागील वर्षे मागे पडून नवीन वर्षाची सुरुवात झाली तरीही अजून तालुक्यातील पर्यटकांचा ओढा काही कमी झालेला दिसत नाही. कोरोनामुळे थंडावलेल्या शालेय सहलींचीही यंदा उच्चांकी उपस्थिती जाणवत होती. अजूनही तालुक्यातील ठिकठिकाणची पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजलेली दिसत आहेत. त्यामुळे नव्या वर्षाची सुरुवात व्यावसायिक दृष्टीने चांगली असल्याचे मानले जात आहे.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्याच्या विविध भागांत पर्यटकांची उपस्थिती असते. येथील समुद्रकिनारे, गडकिल्यांना पर्यटक भेटी देतात. त्यामुळे वर्षअखेरीस सर्वत्र जल्लोषी वातावरण असते. या काळात हॉटेल, निवास न्याहारी सुविधा गजबजलेल्या असतात. पर्यटकांमुळे बाजारात वाढती उलाढाल होते. पर्यटन विषयक व्यवसायांनाही या काळात पर्यटकांकडून अधिक पसंती मिळत असते. यंदा नव्या वर्षाची सुरुवात रविवारच्या दिवसाने झाल्याने त्यावेळेपर्यंत पर्यटकांची तालुक्यात वर्दळ राहण्याची शक्यता मानली जात होती; मात्र आता पहिला आठवडा उलटून गेला तरीही अजूनही तालुक्याच्या विविध भागांत पर्यटकांची वर्दळ दिसत आहे.
येथील पवनचक्की, समुद्रकिनाऱ्यासह तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर, किल्ले विजयदुर्ग येथील भागात पर्यटकांची वर्दळ दिसत होती. येथील हॉटेल व्यावसायही तेजीत असल्याचे दिसतो. त्यातच यंदा शालेय सहलींचे प्रमाण वाढले आहे. कोरोनामुळे मागील सुमारे दोन वर्षांत सहली येणे बंद झाले होते. आता जिल्ह्याच्या विविध भागासह रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड, सांगली जिल्ह्यातील शालेय सहली तालुक्याच्या विविध भागात येताना दिसत आहेत. मोठ्या प्रमाणात सहली येत आहेत. पर्यायाने आपोआपच स्थानिक उलाढालीमध्ये वाढ होताना दिसत आहे. प्रामुख्याने येथील पवनचक्की परिसर, समुद्रकिनारी, देवगड किल्ला तसेच कुणकेश्वर, विजयदुर्ग भागात शालेय सहलींचे प्रमाण अधिक असल्याचे जाणवत आहे. एसटी तसेच खासगी निमआराम गाड्या घेऊन सहली येताना दिसत आहेत. शालेय सहलींमुळे समुद्रकिनारी मुलांचा किलबिलाट ऐकू येत आहे. बाजारातही विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याने खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात व्यावसायिकांना सुखावह असल्याचे दिसत आहे.
चौकट
कातळशिल्प सहलीला प्रतिसाद
येथील देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीच्यावतीने इतिहास संशोधन मंडळाच्या सहकार्याने तालुक्यात कातळशिल्प सहलीचे आयोजन केले होते. वाघोटण, बापर्डे, वानिवडे, तळेबाजार, दाभोळे आदी भागातील कातळशिल्प दाखविण्याचे नियोजन होते. या सहलीला स्थानिकांसह पर्यटकांचा प्रतिसाद लाभला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.