अरुणा धरणाचा उपयोग काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अरुणा धरणाचा उपयोग काय?
अरुणा धरणाचा उपयोग काय?

अरुणा धरणाचा उपयोग काय?

sakal_logo
By

75270
वैभववाडी ः तालुक्यातील अरूणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे.

अरुणा धरणाचा उपयोग काय?

कालवे अपूर्ण; पाणी सोडले जातेय नदीत

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ ः वैभववाडी आणि राजापुर तालुक्यातील १९ गावांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अरूणा प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असुन यात साडेतीन टीएमसी पाणीसाठा आहे; परंतु कालव्यांअभावी साठा केलेले पाणी धरणातून नदीत सोडले जाते. उजव्या आणि डाव्या अशा ३७ किलोमीटर कालव्यांची कामे रखडलेली आहेत. त्यामुळे धरणातील पाणी शेतीला कधी मिळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
तालुक्यातील अरूणा नदीवर उभारण्यात आलेल्या अरूणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प १४ वर्षानंतर आता ९८ टक्के पूर्ण झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने ६० टक्केपेक्षा अधिक पूर्ण झालेली कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा घेतलेला निर्णय आणि प्रधानमंत्री सिंचाई योजनेच्या माध्यमातून या प्रकल्पाला सुधारीत १६०० कोटीची मिळालेली मान्यता यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. पहिल्या टप्प्यातील घळभरणी मे २०१९ आणि दुसऱ्या टप्प्यातील घळभरणी मे २०२१ मध्ये पूर्ण झाली. त्यामुळे आता या प्रकल्पात साडेतीन टीएमसी पाणीसाठा आहे. गेली चार वर्ष या प्रकल्पात पाणीसाठा होत आहे; परंतु या प्रकल्पाच्या कालव्यांची कामेच न झाल्यामुळे धरणातील पाणी नदीत सोडण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय पाटबंधारे प्रकल्पाकडे नाही. या धरणाला उजवा आणि डावा असे दोन कालवे असून उजवा कालवा १४ किलोमीटर लांबीचा आहे तर डावा कालवा २३ किलोमीटर लांबीचा आहे. डावा कालवा हा वैभववाडी शहरातील शुकनदीपर्यंत नियोजित आहे. या दोन्ही कालव्यांची कामे किरकोळ स्वरूपात सुरू आहेत. प्रत्यक्षात हे कालवे कधी पूर्ण होण्यास किती वर्ष लागतील, याचा भरवसा नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा विरोध ओढवून सिंचनक्षमता वाढविण्याच्या हेतूने शासनाने केलेल्या घळभरणी केली; परंतु साठा केलेल्या पाण्याच्या सिंचनक्षमता वाढविण्यासाठी वास्तवात काही उपयोग झाला आहे का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. साठा केलेले पाणी पुन्हा अरूणा नदीतच सोडायचे होते तर पाणीसाठा का केला? असा प्रश्न देखील प्रकल्पग्रस्तांकडून उपस्थित केला जात आहे.
अरूणा प्रकल्पामुळे वैभववाडी तालुक्यातील १७ आणि राजापुर तालुक्यातील २ अशा १९ गावांना थेट फायदा होणार आहे. याशिवाय आणखी दहा ते बारा गावांना अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. या प्रकल्पामुळे ५ हजार ३१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे; परंतु कालव्यांची कामेच पूर्ण झाली नाही तर सिंचनाखाली क्षेत्र येणार कसे? असा प्रश्न लोकांमधून विचारला जात आहे.
-----------
चौकट
...तर ‘देवधर’प्रमाणेच अवस्था?
कुर्ली-घोणसरीच्या देवधर प्रकल्पामुळे वैभववाडी आणि कणकवली तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर ओलिताखाली येणार होते; परंतु या धरणाचा उजवा कालवा दोन अडीच किलोमीटरवर रखडला तर डावा कालव्या देखील अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे धरणाचे पाणी शिवगंगा नदीला सोडले जाते. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे, ते शेतकरी पाण्याचा उपसा नदीतून करतात. २०-२२ वर्षानंतर देखील या प्रकल्पाचे कालवे पूर्ण झालेले नाहीत. त्याच दिशेने अरूणा प्रकल्पांची वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांनी उठाव केला नाही तर या धरणाचे कालवे होण्यास आणखी किती वर्षे लागतील, हे सांगता येणार नाही.
-----------
कोट
अरूणा प्रकल्पाचे ९८ टक्के काम पूर्ण झाले असून उजव्या आणि डाव्या कालव्याची कामे प्रगतीपथावर आहेत. काही ठिकाणी भू-संपादनाची प्रकिया सुरू आहे; परंतु लवकरात लवकर कालव्यांची कामे पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- हर्षद यादव, कार्यकारी अभियंता, अरूणा पाटबंधारे प्रकल्प
-----------
कोट
कालव्यांची कामे चार वर्षांत पूर्ण करायची नव्हती तर घाईगडबडीत २०१९ मध्ये प्रकल्पाची घळभरणी करीत अरूणा प्रकल्पग्रस्तांची घरे पाण्यात का बुडविली? कालव्यांसाठी आणलेले पाईप जागोजागी दिसतात; परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी भू-संपादनच केलेले नाही. त्यामुळे कालव्यांसाठी नेमकी किती वर्षे लागतील, हे पाटबंधारे विभागाने जाहीर करावे.
- तानाजी कांबळे, अरूणा प्रकल्पग्रस्त
-----------
पाँईटर्स
प्रकल्पावर एक नजर
* अरूणा प्रकल्पाला २००५ मध्ये ५४ कोटीची मान्यता
* अनेक वर्षे हा प्रकल्प रखडला
* पुनर्वसनच्या मुद्यावर अनेक आंदोलने
* २०१९ मध्ये प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून सुधारीत १६०० कोटीची मान्यता
* आतापर्यंत १५६० कोटीपेक्षा अधिक रक्कम खर्च
* धरणात साडेतीन टीएमसी पाणीसाठा
* ५ हजार ३१० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
* वैभववाडी आणि राजापुर तालुक्यातील १९ गावांना फायदा
* उजवा १४ तर डावा कालवा २३ किलोमीटरचा