राजापूर ः 88 कोटींचा आराखडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः  88 कोटींचा आराखडा
राजापूर ः 88 कोटींचा आराखडा

राजापूर ः 88 कोटींचा आराखडा

sakal_logo
By

पाण्याच्या नळाचे चित्र वापरावे....


२२३ नळ योजनांचा ८८ कोटींचा आराखडा

राजापूर तालुक्यातील गावे ; घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठ्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः जलजीवन मिशनअंतर्गत ’हर घर नलसे जल’ हा उपक्रम राबवून शासनातर्फे घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. तालुक्याचा २२३ नळपाणी योजनांचा सुमारे ८८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याची ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे अंमलबजावणी सुरू असून १२ गावांमध्ये मुबलक स्वरूपामध्ये पाणी उपलब्ध आहे. भविष्यामध्ये ते कायम राहण्याची शक्यता असल्याने या गावांचा ‘नो डिमांड’मध्ये समावेश झाला आहे. या गावांची लवकरच ‘हर घर नल’ असलेली गावे म्हणून घोषित होणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता खोत यांनी दिली.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत पुढील वर्षापर्यंत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना हर घर नल से जल या उपक्रमांतर्गत पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट्य शासनाने निश्‍चित केले आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करण्यात येणार आहे. यापूर्वी अस्तित्वातील ४० लिटरप्रमाणे पाणी उपलब्ध असणाऱ्या जुन्या योजनादेखील आता ५५ लिटर प्रतिमाणशी प्रतिदिवस योजनेमध्ये परिवर्तीत केल्या जाणार आहेत. या योजनेची तालुक्यात अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून सर्व्हेक्षण करून आराखडा तयार करण्यात आला आहे.
सुमारे ८८ कोटी रुपयांच्या या आराखड्यामध्ये २२३ नळपाणी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. कागपत्रांची परिपूर्तता झालेल्या नळपाणी योजनांच्या कामांना सुरवात झाली आहे. त्यापैकी काही कामे अंतिम टप्प्यामध्ये असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. कागदपत्रांची परिपूर्ण पूर्तता न झालेल्या अद्यापही प्रशासकीय मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. नळपाणी योजनांच्या अंमलबजावणीसाठी गटविकास अधिकारी सुहास पंडित यांनीही प्रयत्न केल्यामुळे अनेक गावांमधील जागांच्या बक्षिसपत्रांचे प्रश्‍न निकाली निघाले आहेत. त्याच्यातून या नळपाणी योजनांच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या महत्वाकांक्षी अभियानाद्वारे गेल्या काही वर्षापासून पाणीटंचाईची समस्या भासत असलेल्या तालुक्याची भविष्यातील पाणीटंचाई दूर होण्याला एकप्रकारे मदत होणार आहे.

‘हर घर नल’ असलेली गावे
राजापूर तालुक्यात जलजीवन मिशन योजनेचा आराखडा तयार करताना काही गावांमध्ये मुलबक स्वरूपामध्ये जलस्रोत, पाणीपुरवठा वा तशी व्यवस्था असल्याचे स्पष्ट झाले. अशा गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी योजना राबवण्याची आवश्यकता नसल्याची बाबही पुढे आली आहे. अशा गावांमध्ये तालुक्यातील १२ गावांचा समावेश आहे. ही गावे लवकरच लोकांच्या मागणीनुसार ‘नो डिमांड’ असलेली गावे म्हणून घोषित होणार आहे. ‘हर घर नल’ असलेली गावे म्हणून या १२ गावांना घोषित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता खोत यांनी दिली.