
हर्णै-नौका उभ्याच, मासळीची आवक घटली
फोटो ओळी
-rat१५p११.jpg- KOP२३L७५६५५
हर्णै ः हर्णै मधील बाजारात रविवारी सकाळी लिलावात कोळंबी मासळीची आवक कमी होती. त्यामुळे लिलावाला गर्दी नव्हती.
-rat१५p१२.jpg-KOP२३L७५६५६ मासळी खरेदीसाठी चिमणी बाजारात पर्यटकांची गर्दी.
--------------
नौका उभ्याच, मासळीची आवक घटली
--
हर्णै बंदरातील चित्र ; चिमणी बाजारात पर्यटकांची गर्दी
सकाळ वृत्तसेवा
हर्णै, ता. १५ ः गेल्या दोन दिवसांपासून उत्तरेकडील वाऱ्यामुळे मच्छीमार नौकांनी धावपळ उडाली होती. मिळेल त्या खाडीत, बंदरात नौकांनी आसरा घेतल्यामुळे मासेमारी थांबली आणि येथील बंदरात मासळीचा तुटवडा पडला आहे. गेले दोन दिवस मासेमारीच करता न आल्यामुळे मासळीची आवकच घटली आहे. स्थिती पूर्ववत कधी होईल हे मात्र येथील मच्छीमार बांधवांना माहित नाही. जोपर्यंत मासळी नाही तोपर्यंत लिलाव देखील व्यवस्थित होणार नाही, असे येथील मच्छीमारांनी सांगितले. दरम्यान रविवारी सकाळी वारा जरा शांत झाल्याने जयगड खाडीत आसऱ्याकरिता गेलेल्या काही नौका मासेमारीकरिता बाहेर पडल्या होत्या.
दोन दिवसांपासून किनारपट्टीला उत्तरेकडील वाऱ्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अतिशय वेगाने वारे वाहू लागल्याने हर्णे बंदरातील बाहेर खोल समुद्रात मासेमारीकरीता गेलेल्या नौकांनी जयगड, रत्नागिरी, दाभोळ , आंजर्ले, हर्णे बंदरात तर काहींनी दिघी खाडीमध्ये सुरक्षिततेसाठी आसरा घेतला. आपल्या नौका मिळेल त्या सुरक्षित ठिकाणी हलवल्या त्यामुळे मासेमारी होऊ शकली नाही. ज्यांच्याकडे काही थोडीफार मारून आणलेली मासळी होती ती शनिवारी (ता.१४) लिलावात आणली.
शनिवार, रविवार सुट्टी असल्याने ताजी मासळी खरेदीसाठी पर्यटकांची गर्दी झाली. चिमणी बाजारातील महिलांनी दोन दिवस अगोदरच मासळी खरेदी करून ठेवली होती. त्यामुळे पर्यटकांना पुरेशी मासळी मिळण्याची शक्यता आहे. अजून पुढे वातावरण जर असेच वेगवान वाऱ्याचे राहिले तर बंदरात मासळीचा तुटवडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी सकाळी वारा जरा शांत झाल्याने जयगड खाडीत आसऱ्याकरिता गेलेल्या काही नौका मासेमारीकरिता बाहेर पडल्या आहेत. परंतु पुन्हा जर जोरदार वारा सुटला तर माघारी फिरणार असल्याचे येथील मच्छीमारांनी सांगितले.
चौकट
पापलेट, सुरमई कमीच
सध्या पापलेट, सुरमई, याप्रकारची मासळी येतच नाही. कोळंबी, म्हाकुळ याची आवक जास्त आहे. परंतु गेले दोन दिवस वाऱ्यामुळे नौका बंद असल्याने लिलावात देखील मासळी कमी होती. नेहमीपेक्षा मासळीचे प्रमाण खूपच कमी असेल. मासळीच्या घटत्या प्रमाणामुळे दरात देखील वाढ होण्याची शक्यता आहे. पर्यटकांना मिळेल ती मासळी खरेदी करावी लागणार आहे. जोपर्यंत वातावरण शांत होत नाही तोपर्यंत मासळीच प्रमाण देखील वाढणार नाही असे बंदरातील मासळी लिलाव करणारे अनंत चोगले यांनी व्यक्त केले.