
केसरकरांना पराभवाची धूळ चाखणार
swt1718.jpg
76205
सावंतवाडीः येथे पत्रकार परिषदेत बोलताना रुपेश राऊळ. बाजुला चंद्रकांत कासार, गुणाजी गावडे, रश्मी माळवदे, श्रृतिका दळवी आदी. (छायाचित्रः रुपेश हिराप)
केसरकरांना पराभवाची धूळ चाखणार
रुपेश राऊळः राणेंचे पाय धरले तरी गप्प बसणार नाही
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः दीपक केसरकर यांनी पक्षाशी गद्दारी करून शिवसैनिकांशी पंगा घेतला आहे. त्यामुळे आता खासदार नारायण राणेंचे पाय धरा किंवा कोणाचीही लाचारी करा; मात्र येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला शिवसैनिक धूळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी दिला. केसरकर यांनी नेहमीच स्वार्थी राजकारण केले. राणेंचा प्रचार करणार, असे वक्तव्य करून आता तर त्यांनी लाचारी काय असते हे दाखवून दिल्याची टिकाही केली.
श्री. केसरकर यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणे खासदारकी लढवत असतील तर मी त्यांचा प्रचार करायला तयार आहे, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राऊळ बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, महिला तालुका प्रमुख रश्मी माळोदे, शहर प्रमुख श्रृतिका दळवी, आबा केरकर आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘सोमवारी आरोस येथे बैठकीसाठी आलेले मंत्री केसरकर विकास कामांवर बोलतील अशी अपेक्षा होती; मात्र विकास कामांवर न बोलता त्यांनी राणेंचे गोडवे गायले. राणे खासदारकी लढवत असतील तर मी त्यांचा प्रचार करायला तयार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे राणेंचे पुन्हा पाय धरण्याचे काम केसरकर यांनी केले. आजपर्यंत केसरकर यांनी स्वार्थीपणाचेच राजकारण केले आहे. शिवसेनेत येताना त्यांनी अशाच प्रकारे उद्धव ठाकरे यांचे गोडवे गायले होते. प्रवेश मिळाल्यानंतर मंत्रीपद मिळेपर्यंत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची नेहमी स्तुती केली; पण मंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी लगेचच विरोधात बोलायला सुरुवात केली; मात्र त्यांनी आता एवढेच लक्षात ठेवावे की, त्यांनी पक्षाशी गद्दारी करुन शिवसैनिकांशी पंगा घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना पराभवाची धूळ चारल्याशिवाय गप्प बसणार नाही.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘केसरकर यांनी मतांचे गणित जुळविण्यासाठी न्यायप्रविष्ठ असलेल्या जागेत मल्टीस्पेशालिटी उभारण्याचा घाट घातला. आता जागेचा वाद मिटत नसेल तर वेत्ये येथे हॉस्पिटल न्यायला आपला विरोध नाही, असे ते सांगत आहेत. म्हणजेच केसरकर यांना उशिरा का होईना, शहाणपण सुचले. मुळात खासदार विनायक राऊत हे मल्टीस्पेशालिटी वेत्येत न्यायला आग्रही होते. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यामार्फत या जागेचा चार वेळा प्रस्ताव दिला; मात्र केसरकरांनी आपल्या स्वार्थासाठी हे काम आजपर्यंत रेंगाळत ठेवले. एकूणच केसरकारांना उशिरा सुचलेल्या शहाणपणाचे श्रेय मी ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर यांना देतो. कारण त्यांनी जागेच्या प्रश्नाच्या मुळाशी हात घातला व वस्तुस्थिती समोर आणली.’’
चौकट
केसरकरांकडून हजारो कार्यकर्ते मोडीत
यावेळी उपजिल्हाप्रमुख कासार यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, ‘‘सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणूकीनंतर भाजपवर टिका करणार्या आपल्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांना दाबण्याचे काम केसरकरांकडुन होत आहे. केसरकर यांनी अशाच प्रकारे आजपर्यंत कोणालाच मोठे होऊ दिले नाही. त्यांनी हजारो कार्यकर्ते मोडीत काढले. स्वतःच्या कार्यकर्त्यांवर काल केलेले वक्तव्य हा त्यातलाच एक प्रकार आहे.’’