
वाहतूक नियमांबाबत वेंगुर्लेत जनजागृती
वाहतूक नियमांबाबत वेंगुर्लेत जनजागृती
वेंगुर्लेः पोलिस ठाण्यातर्फे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मठ-कुडाळ तिठा ते मठ भागात वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत दुचाकी रॅलीचा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. वेंगुर्ले पोलिस ठाण्यांतर्गत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत तालुक्यातील गर्दीची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेल्या भागात पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिस मनोज परुळेकर व पोलिस कर्मचारी व्यावसायिक, रिक्षा, दुचाकी वाहनधारक यांना तसेच सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करणे, रिक्षा भाडे नियमानुसार घेणे, वाहने योग्यरित्या कोणासही अडथळा येणार नाही अशा ठिकाणी व पध्दतीने पार्क करण्याच्या सूचना दिल्या.
--------------
चौकेत २५ पासून विविध कार्यक्रम
मालवणः येथील सार्वजनिक माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे येथील माघी गणेश चौक येथील गणेश मंदिराचा सातवा वर्धापन दिन व वार्षिक उत्सवानिमित्त २५ ते २९ जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. २४ ला उदक शांती, मालवण बाजारपेठ मार्गे श्रींचे आगमन, दिंडी (विठ्ठल-रखुमाई मंडळ, आचरा देऊळवाडी), २५ ला गणेश मूर्ती पूजा, त्रिमूर्ती मंडळाचे भजन, सिंधुरत्न कलामंच मालवण प्रस्तुत ''द व्हरायटी शो-डान्स व्हायरस'', २६ ला हळदीकुंकू, भजन, रेकॉर्ड डान्स, २७ ला अथर्वशीर्ष पठण, सहस्त्र मोदकांचा नैवेद्य, आरती, भजन, ओंकारा ग्रुप, मालवणचा व्हरायटी शो, २८ ला धार्मिक कार्यक्रम, आरती, भजन, नेरुर-वाघचौडी प्रस्तुत दोन अंकी नाटक ''चांडाळ चौकडी,’ २९ ला महाप्रसाद, श्रींची सवाद्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
--------------
शिवडावात २० ला ''अवकाश दर्शन''
कणकवलीः आपल्या अफाट विश्वाचा आपल्याला परिचय व्हावा तसेच खगोलशास्त्राविषयी आपली समज वाढावी, या उद्देशाने शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथे शुक्रवारी (ता. २०) सावंत फाउंडेशन कळसुली या संस्थेतर्फे ''अवकाश दर्शन'' कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी मुंबईहून खगोलतज्ज्ञ उपस्थित राहून मोठ्या क्षमतेच्या दुर्बिणीद्वारे अवकाशातील ग्रहतार्यांची रचना समजावून सांगणार आहेत. खगोलशास्त्रावर पीपीटी तसेच व्हिडिओद्वारे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवडाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय मसवेकर, शालेय समिती अध्यक्षा भाग्यरेखा दळवी, शिवडाव सेवा संघ, मुंबईचे अध्यक्ष श्रीरंग शिरसाट, कार्याध्यक्ष मोहन पाताडे, कार्यवाह काशिराम गावकर तसेच सावंत फाउंडेशनचे शरद सावंत यांनी केले आहे.
--------------
मसुरेत माघी गणेश जयंती
मालवणः मसुरे मार्गाचीतड येथील महागणपती मंदिर येथे २५ ला महागणपती विश्वस्त मंडळातर्फे माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता महागणपती पूजा व अभिषेक, ८.३० वाजका सहस्त्रावर्तने, ९ वाजता धार्मिक कार्यक्रम, दुपारी १२ वाजता महाआरती व तीर्थप्रसाद, १२.३० ते २ महाप्रसाद, २ वाजता हळदीकुंकू समारंभ, सायंकाळी ७ वाजता देवश्री संगीत क्लासेस शाखा मसुरेचे बुवा सागर राठवड यांचे भजन, रात्री ९ वाजता अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळाचा ''मयूर जन्म'' नाट्यप्रयोग होणार आहे. उत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महागणपती विश्वस्त मंडळाने केले आहे.
..................