पिक नोंद नसलेले भात उत्पादक तोट्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिक नोंद नसलेले भात उत्पादक तोट्यात
पिक नोंद नसलेले भात उत्पादक तोट्यात

पिक नोंद नसलेले भात उत्पादक तोट्यात

sakal_logo
By

पिक नोंद नसलेले शेतकरी तोट्यात
भात उत्पादकांना आर्थिक भूर्दंड; शासकिय आधारभूत दरापासून वंचित
रुपेश हिराप ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ः ऑनलाईन ई-पिक पाहणी न केल्याने अनेक शेतकरी शासन आधारित भात विक्रीपासून वंचित राहिले आहेत. मुळातच ई-पीक नोंदणी प्रक्रिया बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत न पोहचल्याने ही स्थिती ओढवली आहे. आता प्रत्यक्ष भात विक्रीवेळी स्थिती लक्षात आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. कारण खुल्या बाजारपेठेत भात विक्रीचा दर तुलनेत कमी आहे.
दुष्काळ, मुसळधार पाऊस, गारपीट, चक्रीवादळ, पूर, अवकाळी पाऊस यांसारख्या कारणांमुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. त्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. राज्यात पिकांच्या पेरणीची नोंदणीही कागदोपत्री होत असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यास विलंब होत होता; मात्र या सर्व समस्यांचा विचार करून राज्याने गतवर्षीपासून शेतकऱ्यांच्या पीक पेरणीची माहिती अॅपद्वारे गाव नमुना नंबर १२ मध्ये नोंदविण्यासाठी स्वतः शेतकऱ्यांनी उपलब्ध करून देण्याचा ई-पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविला.
शेतकऱ्यांच्या पीक पेरण्यांची नोंद ही पुर्वी तलाठ्यांमार्फत केली जात होती; परंतु तलाठ्यांची कमी संख्या तसेच तलाठ्यांची वाढती कामे यामुळे त्यांना शेतीची पाहणी करून पीक पेरणीची अचूक नोंद करणे शक्य होत नाही. त्यामुळे एखादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यास अडचण निर्माण होत असे. त्यामुळे या सर्व अडचणींचा विचार करून शेतकऱ्यांनी पेरलेल्या पिकाची अचूक नोंद शासनाच्या अभिलेखामध्ये व्हावी आणि त्याचा शेतकऱ्यांनाही संकटकाळात नुकसान भरपाईसाठी जलद गतीने लाभ व्हावा, हा उद्देश समोर ठेवून ई-पीक पाहणीचा प्रकल्प राज्यात राबविण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. यात स्वतः शेतकरी मोबाईलद्वारे आपली पिक नोंदणी करु शकत होता.
गतवर्षी आणि यावर्षी महसूल विभागाकडून ई-पिक पाहणी कार्यक्रम राबविण्यात आला. संबंधित अॅपमध्ये आपल्या पिकाची कशी नोंद करावी, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले; मात्र जिल्ह्याचा विचार करता ठराविक शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला; मात्र अजून असे काही शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ही योजना अद्यापपर्यंत पोहचलीच नाही. बऱ्याच जणांना संबंधित अॅपमध्ये माहिती कशी भरावी हे समजलेच नाही. काही शेतकरी मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात साक्षर नाहीत. बरीच शेती दुर्गम गावामध्ये आहे. ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क, इंटरनेट नाही. अनेक शेतकऱ्यांना स्मार्टफोन वापरता येत नाहीत किंवा त्यांच्याकडे नाहीत. अशा अनेक जणांना ई-पिक नोंदणी आपण स्वतः पुढाकार घेऊन करायची आहे, हे माहितच नव्हते. त्यामुळे शेतकरी ई-पीक पाहणी ऑनलाईन करु शकले नाहीत. ज्या महसूल विभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत सहकार्य करणे गरजेचे होते, त्यांनी प्रत्यक्षात आपली जबाबदारी टाळली. काही महसूल अधिकाऱ्यांनी जातीनिशी आपल्या कार्यक्षेत्रात ई-पिक पाहणी कार्यक्रम राबवला; मात्र काही भागात कागदी घोडे नाचवले गेले. बऱ्याच भागात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या ठिकाणी असलेल्या तुकडा पद्धतीमुळे बरेच प्रश्न उभे राहिले. गेल्या खरिप हंगामातील ई-पिक नोंदणी ठराविक कालावधीनंतर बंद करण्यात आली. नंतर रब्बी नोंदणी खुली करण्यात आली. आता खरिपाची कापणी व इतर प्रक्रिया करुन भात विक्री करायच्या वेळी आपली नोंदणी नसल्याचे या शेतकऱ्यांच्या लक्षात आले. नोंदणी नसल्याने सरकारी आधारभूत किंमतीत भात खरेदी केंद्रांवर अशा शेतकऱ्यांचे भात घेण्यास नकार मिळाला. यामुळे नोंदणी न झालेले शेकडो शेतकरी अडचणीत आले आहेत.
गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी खरेदी विक्री संघात भात विक्रीची नोंद कमी प्रमाणात झाली. सद्यस्थितीत २ हजार २०० पर्यत क्विंटलला दर आहे. हाच दर खासगी विक्रीमध्ये खूपच कमी आहे. यामुळे नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
-------------
कोट
ई-पिक पाहणी कार्यक्रम महसुल विभागाने योग्य पध्दतीने राबविला; मात्र काही शेतकरी अजूनही यापासून वंचित राहिले. जिल्ह्यात ७० टक्के ऑनलाईन ई-पिक पाहणी झाली. याठिकाणी असलेली तुकडा पध्दत काहीअंशी काही प्रमाणात ई-पिक पाहणी करण्यास आडवी येते. येथील शेतकऱ्यांनी अडचणी असल्यास महसुल अधिकाऱ्यांकडे जाणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत रब्बी ई-पिक पाहणी कार्यक्रम सुरु आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.
- संतोष खरात, नायब तहसिलदार कुळवहीवाट, ओरोस
------------
चौकट
तालुकानिहाय झालेली ई-पिक पाहणी नोंद
तालुका*ई-पीक पाहणी खातेदार संख्या*पीक पाहणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
कणकवली*२०८*५२.५७
कुडाळ*२३१*१७१.९७
देवगड*६७*२९.१६
दोडामार्ग*२६*१७.८१
मालवण*११२*४७.४१
वेंगुर्ले*१५९*३२.०७
वैभववाडी*४०*२४.८६
सावंतवाडी*३२४*१००.१६
--------------
चौकट
तालुका खरेदी संघाकडे झालेली भात खरेदी
तालुका*क्विंटल
वेगुर्ले*१५००
सावंतवाडी*२४००
देवगड*१०००
कणकवली*१६००
वैभववाडी*१०००
कुडाळ*२०००
मालवण*५००
------------