दर्जेदार सेवेसाठी बीएसएनएल कटिबध्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दर्जेदार सेवेसाठी बीएसएनएल कटिबध्द
दर्जेदार सेवेसाठी बीएसएनएल कटिबध्द

दर्जेदार सेवेसाठी बीएसएनएल कटिबध्द

sakal_logo
By

swt१७३०.jpg
७६३१७
सावंतवाडी ः ग्राहक मेळाव्याचे उद्घाटन करताना बीएसएनएलचे कोल्हापूर विभाग महाप्रबंधक अरविंद पाटील, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा प्रबंधक रविकरण जन्नू, अॅड. नकुल पार्सेकर आदी.

दर्जेदार सेवेसाठी बीएसएनएल कटिबध्द
महाप्रबंधक अरविंद पाटीलः सावंतवाडीत जिल्हास्तरीय ग्राहक मेळाव्यास प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १७ ः जिल्ह्यातील बीएसएनएलच्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्या ग्राहक, ग्रामपंचायतींच्या तक्रारी असतील, त्यांचा पुढील एका महिन्यात निपटारा केला जाईल, असे आश्वासन दूरसंचार महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी ग्राहक मेळाव्यात दिले. बीएसएनएल सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय बीएसएनएलचा ग्राहक मेळावा आज टेलिफोन भवन, सावंतवाडी येथे झाला. यावेळी पाटील बोलत होते.
यावेळी जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, जिल्हा प्रबंधक रविकरण जन्नू, व्यापारी संघाचे नंदन वेंगुर्लेकर, ग्राहक संरक्षणचे अॅड. नकुल पार्सेकर, अॅड. संजू शिरोडकर, दिलीप भालेकर, राजेश पनवेलकर, प्रसाद आरविंदेकर, बीएसएनएलचे व्ही. एन. कुलकर्णी, सुधीर देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
बीएसएनएलचे सुधीर देशमुख यांनी जिल्ह्यात नवीन ५० टॉवर उभे करण्यात येणार आहे. तर २२ टॉवर अपग्रेड करण्यात येतील. त्यामुळे फोरजी सेवा दिली जाईल. तसेच १०९ टॉवर मंजूर झाले असून त्यापैकी शंभर टॉवर नवीन, तर नऊ टॉवर अपग्रेड करून फोरजी सेवा दिली जाईल. बॅटरी, रस्ते दुरुस्ती, गॅस पाईपलाइन टाकताना खोदकामामुळे सेवा विस्कळीत झाली होती, असे सांगितले. जिल्हा व्यापारी संघाचे वेंगुर्लेकर, अॅड. पार्सेकर, अॅड. शिरोडकर, भालेकर, पनवेलकर व अन्य सदस्यांनी ग्राहक सेवा, नेटवर्क आदी समस्यांबाबत व्यथा मांडली. जिल्ह्यातील दूरसंचारची यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाली असून ४ लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना याचा फटका बसत आहे, याची जाणीव उपस्थित ग्राहकांनी कोल्हापूर विभाग महाप्रबंधक पाटील यांना करून दिली. मोबाईल टॉवर, मोबाईल सिमकार्ड, लँडलाईन, ब्रॉडबँड, एफटीटीएच, लीज कनेक्शन, ओएफसी केबल या सर्व सुविधा व्हेंटिलेटरवर असून केंद्राने बीएसएनएल कंपनीचे खासगीकरण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित नागरिकांनी अधिकाऱ्यांना केला; मात्र याचे समर्पक उत्तर कोणीच देऊ शकले नाहीत.
आजचा ग्राहक मेळावा तब्बल वीस ते बावीस वर्षांनी व्यापारी महासंघाच्या मागणीप्रमाणे होत असून यापुढे दर महिन्याला प्रत्येक तालुक्यात ग्राहक मेळावे व्हावेत, अशी प्रमुख मागणी प्रसाद पारकर, वेंगुर्लेकर यांनी केली. दीर्घ चर्चेनंतर ती मागणी मान्य करण्यात आल्याचे वेंगुर्लेकर यांनी सांगितले. येत्या ३१ मार्चपूर्वी पुन्हा नियोजनबद्ध ग्राहक मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. ग्राहकांच्या अडीअडचणी, समस्या सोडविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची ग्वाही उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली. तसेच बीएसएनएलचे ग्राहक, ग्रामपंचायत यांच्या प्रलंबित लेखी अडचणी असल्यास पुढील एका महिन्यात त्यांचे निवारण करण्यात येईल, अशी हमी बीएसएनएल अधिकाऱ्यांनी दिली.