पर्यटनाबरोबर संस्कृतीही जपणे आवश्यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यटनाबरोबर संस्कृतीही जपणे आवश्यक
पर्यटनाबरोबर संस्कृतीही जपणे आवश्यक

पर्यटनाबरोबर संस्कृतीही जपणे आवश्यक

sakal_logo
By

76426
सावंतवाडी ः व्याख्यानमालेत बोलताना प्रसाद गावडे. शेजारी मान्यवर.


पर्यटनाबरोबर संस्कृतीही जपणे आवश्यक

प्रसाद गावडे ः सावंतवाडीच्या कचरा डेपोमुळे तेरेखोल नदीचे मुख प्रदूषित

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १८ ः पर्यटन आणि विकासाच्या नावाखाली सिंधुदुर्ग जिल्हा ओरबडला जात आहे. जिल्ह्यात येणारा पर्यटक आनंद घेण्यासाठी येत असतो. भविष्यात असेच सुरू राहून हिरवे डोंगर बोडके झाल्यास येथे येणाऱ्या पर्यटकांना आम्ही काय दाखवणार? त्यामुळे पर्यटनाबरोबरच परंपरा, संस्कृतीही जोपासणे गरजेचे आहे, असे मत पर्यटक अभ्यासक तथा ‘रान माणूस’ प्रसाद गावडे यांनी आज येथे व्यक्त केले. सावंतवाडीच्या कचरा डेपोमुळे तेरेखोल नदीचे मुख प्रदूषित होत असून या विरोधात चळवळ उभी राहणे गरजेचे आहे, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
सावंतवाडी येथे श्रीराम वाचन मंदिर आणि क्रीडा भवन सावंतवाडीतर्फे आयोजित केलेल्या देशभक्त प्रभाकरपंत वालावलकर व्याख्यानमालेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश लळीत, श्रीराम वाचन मंदिरचे सचिव रमेश बोंद्रे, कार्याध्यक्ष अ‍ॅड. संदीप निंबाळकर, सदस्य राजेश मोंडकर आदी उपस्थित होते.
गावडे म्हणाले, ‘‘या ठिकाणी पर्यटनाचे नाव पुढे करून आधुनिकता आणली जात आहे; मात्र पर्यटक हा देव नाही. तो या ठिकाणी चंगळ करण्यासाठीच आलेला असतो. त्यामुळे आतिथ्याबरोबरच आपली परंपरा, संस्कृती जोपासून या ठिकाणी पर्यटन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. कोकणात म्हणा किंवा सिंधुदुर्गात निसर्गरम्य किनारे डोंगर आहेत, समुद्र किनारे आहेत. त्यांचा प्रथम अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यानंतरच आपल्याला निसर्गातील आपलेपणा समजू शकतो. दक्षिण गोव्याच्या विकासासाठी जिल्ह्यातील इन्सुली, सोनुर्ली आणि दोडामार्गातील काही गावे ओरबाडली जात आहेत. दोन्ही ठिकाणी तीसहून अधिक क्रशर आहेत. त्यामुळे यात नेमका कोणाचा विकास होत आहे, याचे उत्तर आताच्या पिढीने तपासायला हवे. भविष्यात सिंधुदुर्गातील हिरवे डोंगर अशा पध्दतीने बोडके झाल्यास आम्ही या ठिकाणी येणार्‍या पर्यटकांना नेमके काय दाखवणार? याचाही विचार होणे गरजेचे आहे. दक्षिण गोव्याच्या विकासासाठी सिंधुदुर्ग ओरबाडला जातोय, हे थांबायला हे. त्यासाठी युवा पिढीने वेळीज जागृत होण्याची गरज आहे’’
---
कोकणातील जैवविविधता जपा
गावडे म्हणाले, ‘‘बर्फ सोडला तर कोकणात सर्व काही आहे. डॉल्फिन दिसतो, पट्टेरी वाघ दिसतो; मात्र ही जैवविविधता जपायला हवी. आधुनिकीकरण किंवा पर्यटनाचे नाव पुढे करून ही संपत्ती कोणी नष्ट करू नये. त्यामुळे आताच ‘कोकण वाचवा’ची हाक देऊन त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या पातळीवर पुढाकार घेऊन त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गाडगीळ अहवालात काय आहे, हे सांगण्याचे काम या ठिकाणी पावसाने केले. दोन वर्षांपूर्वी पावसाने उन्माद घातला आणि त्याचा फटका अनेकांना सहन करावा लागला. त्यामुळे निसर्ग वाचविणे काळाची गरज आहे; अन्यथा भविष्यात याचा फटका पुढच्या पिढीला बसेल.’’