वास्तू आणि पर्यावरण

वास्तू आणि पर्यावरण

Published on

76079

वास्तू आणि पर्यावरण

लीड
आपण स्वतःसाठीचे घर आयुष्यात एकदा किंवा दोनदाच खरेदी किंवा बांधतो. यासाठी आयुष्याची पुंजी पणाला लावतो. त्यातून आर्थिक फायद्यापेक्षा सुख, समाधान अपेक्षित असते. त्यामुळे घर बांधताना अनेक घटकांचा विचार केला जातो. तरीही बरेचजण एक महत्त्वाची गोष्ट विसरतात, ती म्हणजे पर्यावरण. घर बांधताना आजूबाजूचा निसर्ग, पर्यावरण याचा आधी अभ्यास करायला हवा. तो का? हे समजून घेण्याचा हा प्रयत्न...
- श्रीराम पेडणेकर
-----------
असावे घरटे अपुले छान ... प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला एक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आयुष्याच्या प्रवासातील अनेक बरेवाईट प्रसंग पाहिलेल्या घराबद्दल व्यक्तींच्या, कुटुंबांच्या मनात एक हळवा कोपरा असतोच असतो. मानवसमाजाच्या आदिम संस्कृतीकडून नागर संस्कृतीकडच्या प्रवासात निवारा ही केवळ शारीरिक गरजेची बाब न राहता सांस्कृतिक गरज बनली. अश्मयुगात ऊन, थंडी, वारा, पाऊस यांच्यापासून निवारा आणि श्वापदांपासून संरक्षण देणारी नैसर्गिक गुहा ते ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, इथे असावा, प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती’ इथंवरचा हा मोठा प्रवास आहे.
घर साधारणतः आयुष्यात एकदा फारतर दोनदा बांधले, विकत घेतले जाते. त्यामुळे घर ही आर्थिकदृष्ट्याही फार मोठी गुंतवणूक असते. घर ही गुंतवणूक असली तरी त्यातून मिळणारा परतावा हा प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाचा नसून सुख समाधानाच्या रूपात मिळत असतो. म्हणून जिथे आपले कुटुंब आणि येणाऱ्या पिढ्या वसणार आहेत ते घर बांधताना अनेक बाबींचा साकल्याने विचार करणे फार आवश्यक ठरते.
आपल्याकडे ‘घर पहावे बांधून’ ही म्हण फार प्रसिद्ध आहे. नवीन घर बांधायचे ठरले की मालकीची जागा नसेल, तर आपल्या गरजा आणि आर्थिक क्षमतेनुसार जागा शोधणे, जागेच्या मालकी व हस्तांतरणाबाबत आवश्यक शहानिशा करून व सर्व तांत्रिक सोपस्कार आटोपून ती विकत घेणे, विकत घेतलेली जागा आपल्या नावावर लावून घेणे इथंपासून सुरुवात होते. यानंतर आपल्या स्वप्नातील घरकुलाचा आराखडा कागदावर आणण्यासाठी योग्य वास्तुविशारद गाठणे, आवश्यक त्या तांत्रिक परवानग्या मिळवून प्रत्यक्ष बांधकामासाठी कंत्राटदार, बांधकाम साहित्य वगैरेची जुळवाजुळव करणे, बांधकाम झाल्यानंतर रंगकाम, अंतर्गत सजावट आणि शेवटी एकदाचा गृहप्रवेश अशा एका मोठ्या दिव्यातून घरमालक किंबहुना त्याच्या सर्व कुटुंबालाच जायला लागते. यातील तांत्रिक कामे विशेषतः शासनदरबारची कामे घरमालकाच्या चिकाटीचा अंतच बघतात. आर्थिक क्षमता असेल म्हणून ही कामे अगदी सुरळीत आणि वेळेवर होतीलच याची काही शाश्वती नसते, हा सर्वसाधारण अनुभव आहे.
बांधकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आज घरबांधणीसाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. लोड बेअरिंग, आरसीसी सोबत आज केवळ काही दिवसांत उभारली जाता येतील, अशा प्री-फॅब्रिकेटेड घरांचा पर्याय देखील उपलब्ध आहे. इतकेच काय तर कंटेनर होम्ससारखा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेता येण्यासारखा पर्याय देखील उपलब्ध आहे. या सर्व उपलब्ध पर्यायांमधून प्रामुख्याने आपल्या गरजा आणि आर्थिक क्षमता यांच्या आधारावर योग्य विकल्प निवडावा लागतो. घर बांधताना सर्वसाधारणपणे आपण आधी पाहिलेले आणि आपल्याला आवडलेले घर आपल्या कल्पनेत असते. त्या घराची वास्तुरचना, त्यात वापरलेले बांधकाम साहित्य, रंगसंगती, अंतर्गत सजावट, सोयीसुविधा या बाबींचा विचार प्रामुख्याने आपल्या मनात असतो. त्या बाबींचा सापेक्ष आपल्याला आर्थिकदृष्ट्या शक्य असलेले घर बांधायचा आपला प्रयत्न असतो.
नवीन घर बांधताना या सर्व बाबींसोबत अत्यंत महत्त्वाची आणि सहसा फार महत्त्व न दिली जाणारी बाब म्हणजे घर ज्या ठिकाणी बांधायचे आहे, तिथले पर्यावरण. घर ही पिढ्यान्‌पिढ्या राहणारी गोष्ट असल्याने सभोवतालच्या पर्यावरणीय घटकांचा त्या वास्तूवर साधकबाधक परिणाम हा होतच असतो. त्यामुळे घरबांधणीतील प्रत्येक घटकाच्या पर्यावरणाशी समतोलाचा विचार होणे हे अत्यंत आवश्यक असते. उदाहरणार्थ जपानमधील भूकंपप्रवण भागात घरे बांधताना कमीतकमी वित्तहानी आणि शून्य मनुष्यहानी या बाबी प्रामुख्याने विचारात घेतल्या जातात. सरासरी तापमान अत्यंत कमी असलेल्या भूभागांमध्ये घरे बांधताना घराच्या आतले तापमान राखले जाण्याकरिता उष्णतेचे दुर्वाहक असलेल्या साहित्याचा वापर करणे गरजेचे ठरते. आपल्या कोकणासारख्या उच्च पर्जन्यमान असलेल्या भागांमध्ये घराचे छप्पर, तसेच भिंतींवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा कमीतकमी वेळात होईल, अशी वास्तुरचना आणि ओलावा शोषून न घेणाऱ्या बांधकाम साहित्याचा वापर होणे अत्यंत गरजेचे आहे.
घरबांधणी प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे प्रस्तावित वास्तूचा आराखडा. वास्तूचा आराखडा तयार करताना प्राथमिकपणे कुटुंबाच्या गरजा, अभिरुची आणि आर्थिक गणिते विचारात घ्यावी लागतात. नवीन घर बांधताना पारंपरिक भारतीय वास्तुशास्त्राचा अजिबातच विचार न करणारे घरमालक आजकाल शोधूनही सापडायचे नाहीत. वास्तुशास्त्र हे खरोखर शास्त्र आहे की थोतांड, या वादात न पडता त्यातील घेण्यासारख्या बाबी जरूर घ्याव्यात, विशेषतः घर नव्याने बांधत असताना. प्लॉटच्या दिशा, प्लॉटकडे येणारा रस्ता, जमिनीची पातळी आणि चढउतार, आजूबाजूला असलेली झाडे, इतर इमारती, प्लॉटवर पडणारा सूर्यप्रकाश, त्या भागातले पर्जन्यमान, तेथील वाऱ्याची सर्वसाधारण दिशा, पाण्याचा स्रोत अशा पर्यावरणीय घटकांचा साकल्याने विचार करून प्रस्तावित घरातील सर्व भागांत उत्तम सूर्यप्रकाश व खेळती हवा राहणे या बाबी साधणे अत्यंत आवश्यक. सूर्यप्रकाशाच्या काटकोनात असलेला पृष्ठभाग जास्तीतजास्त उष्णता शोषत असतो. कोकणच्या बाबतीत उन्हाळा उत्तरायण काळात येत असल्याने उन्हाळ्यात मध्यानीच्या काळात सूर्य डोक्यावर असतो. त्यामुळे उष्णता प्रतिरोध आणि मुख्यत्वेकरून नैऋत्येकडून ईशान्य दिशेकडे पडणाऱ्या मुसळधार पावसाचे पाणी त्वरित निचरा होण्यासाठी योग्य कोन असलेले उतरते छप्पर, तसेच दक्षिण व पश्चिम दिशांच्या भिंतींवर पावसाचे पाणी कमीतकमी पडेल, अशी रचना श्रेयस्कर ठरते.
यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे बांधकाम साहित्य. यामध्ये सर्वसाधारणपणे वापरले जाणारे प्रचलित साहित्य म्हणजे सिमेंट, वाळू, खडी, स्टील, विटा आणि आता उपलब्ध असलेले सिमेंट ब्लॉक्स तसेच कोटा, काडाप्पा, राजस्थानी मार्बल, ग्रॅनाईट, ढोलपुरी, जैसलमेर असे वेगवेगळे नैसर्गिक दगड.
कोकणच्या बाबतीत यातील अत्यंत पर्यावरणपूरक असा एक घटक म्हणजे चिरा. चिऱ्याच्या उत्खनन आणि वाहतुकीत विटांच्या मानाने अत्यंत कमी कार्बन उत्सर्जन होत असते. त्याचबरोबर चिऱ्याच्या नैसर्गिक रचनेमुळे प्लास्टरिंग व उष्णतारोधनही चांगले होते. वास्तविक चिऱ्यासोबत चुन्याचा वापर हा अधिक पर्यावरणपूरक ठरू शकेल; परंतु उपलब्धता आणि कारागिरी या दोन बाबींच्या कमतरतेमुळे हा पर्याय आजतरी किफायतशीर ठरत नाही. फ्लोरिंगसाठी नैसर्गिक दगड आणि व्हीट्रीफाइड लाद्यांचे अनेकानेक पर्याय आज उपलब्ध आहेत. त्यातून उष्णताप्रतिरोधक असलेला आणि आपल्या आवडत्या रंग व डिझाईनचा योग्य पर्याय निवडता येतो. बाथरूममध्ये घसरण प्रतिबंधक तसेच अंगणात उष्णता शोषून न घेणाऱ्या व शेवाळ साचल्यास सहज सफाई करता येतील, अशा लाद्या बसवाव्यात. घरबांधणीत हल्ली लाकूडसामानाचा वापर बराच कमी झालेला दिसतो. खिडक्या आता सर्वसाधारणपणे काच आणि अॅल्युमिनिअम फ्रेम्सचा वापर करून बसवल्या जातात. एका दृष्टीने ते पर्यावरण पूरकही म्हणता येतील, कारण आयुष्यमान अधिक असल्याने ते लाकडाऐवजी योग्यच ठरते. घरातील सिमेंट, दगड, काच, धातू अशा निर्जीव घटकांसोबत असलेला अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे झाडे. घराच्या परिसरात आपल्या पर्यावरणातील स्थानिक जातींचे छायावृक्ष, फळझाडे, फुलझाडे, वेली वगैरे अवश्य असाव्यात. Life attracts life या इंग्रजी म्हणीनुसार घरात आणि घराच्या परिसरात जीवनाचे आणि सृजनाचे प्रतीक असलेली झाडे असायलाच हवीत. केवळ एक काळजी आवर्जून घेतली जावी की अशी झाडे लावताना आपल्या पर्यावरणातील मूळ जातीच निवडाव्यात. पारंपरिक भारतीय वास्तुशास्त्रात औषधी मूल्ये व सकारात्मक ऊर्जा असलेल्या झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचे वास्तुशास्त्रीय महत्त्व जरी सोडून दिले तरी पर्यावरणीय प्रभावासाठी अशी सोयरी वृक्षवल्ली आपल्या सोबत जरूर नांदावी.
---
घर हे अंतिमत: पर्यावरणाचे घटकच
एकूणच काय की सजीव मनुष्य अथवा तांत्रिकदृष्ट्या निर्जीव भासणारे घर हे अंतिमत: आपल्या पर्यावरणाचे घटकच आहेत. त्यामुळे त्यांचा पर्यावरणाशी समतोल आणि समत्व असणे हे मानवी जीवनासाठी अपरिहार्यच ठरते. त्यामुळे नवीन घर बांधताना आपल्याकडे कल्पिलेला वास्तुपुरुष हा निसर्गदेवतेशी तादात्म्य पावलेला असला, तर त्या वास्तूत नांदणाऱ्या कुटुंबाला सुखीसमुद्ध जीवन लाभणे खचितच सुकर ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com