नैसर्गिक हळदीमध्ये ‘कुरकुमीन’ वाढले

नैसर्गिक हळदीमध्ये ‘कुरकुमीन’ वाढले

Published on

76981
प्रतिभा भालेकर-नाईक

76980
हळद लागवडीचा प्रयोग


76978
नैसर्गिक पद्धतीने उत्पादीत केलेली हळद.

76979
नैसर्गिक हळद पॅकिंग करून मुंबई व इतर शहरांमध्ये विक्री केली जाते.

नैसर्गिक हळदीमध्ये ‘कुरकुमीन’ वाढले

चिंचवलीत प्रयोग; औषध कंपन्यांकडून मागणी

एकनाथ पवार ः सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. २० ः चिंचवली (ता.कणकवली) येथील महिला शेतकरी प्रतिभा भालेकर-नाईक यांनी नैसर्गिक पध्दतीने उत्पादन घेतलेल्या हळदीमध्ये औषधी कुरकुमीनचे प्रमाण ५.९९ टक्के असल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. अधिक कुरकुमीन असलेल्या हळदीला औषधी कंपन्यामध्ये मागणी असल्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही खूप मोठी बाब मानली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी भविष्यात हळद लागवडीचा सक्षम पर्याय निर्माण झाला आहे.
बदलत्या वातावरणामुळे कोकणातील फळबागायतदार त्रस्त आहेत. त्यामुळे भविष्यात येथील शेतकऱ्यांना शेती उत्पादनातील सक्षम पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासंदर्भात विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहे; परंतु कोकणातील हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण इतर भागातील हळदीपेक्षा अधिक असल्याचे स्पष्टीकरण दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले होते. त्याचवेळी त्यांनी हळदीमधील कुरकुमीनचा वापर विविध औषधी कंपन्या करतात, हे देखील सांगतानाच हळदीतील कुरकुमीन वेगळे करण्यावर संशोधन सुरू असल्याचे स्पष्ट केले होते. त्यालाच अनुसरून एक सकारात्मक बातमी कोकणातील शेतकऱ्यांसाठी पुढे आली आहे.
रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका असलेल्या चिंचवली (ता.कणकवली) येथील महिला शेतकरी प्रतिभा भालेकर-नाईक यांनी पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्या विषमुक्त आणि नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण घेतले. मुंबईत राहत असलेल्या भालेकर या कोरोना काळात गावी चिंचवली येथे आल्या. त्यांनी शेती करण्याचा निश्चय करताना विषमुक्त शेतीच करण्याचा धाडसी निर्धार केला. नैसर्गिक शेती पध्दतीचा वापर करून सुरूवातीला १ गुंठा आणि त्यानंतर यावर्षी दोन एकर क्षेत्रात हळदपिक लागवड केली. देशी गायीचे शेण, गोमुत्र आदीचा वापर त्यांनी केला. बीजामृत, जीवामृत, घन जीवामृत आणि वापसा या तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी हळद लागवडीत केला. पहिल्या वर्षी आलेल्या हळद पिकांबद्दल त्यांना उत्सुकता होती. त्यामुळे त्यांनी या हळदीतील गुणधर्म तपासण्याकरीता वारणी लॅब (ठाणे) येथे हळद सॅम्पल पाठविले. लॅबचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये हळदीत कुरकुमीनचे प्रमाण ५.९९ टक्के आढळून आले आहे. औषधी घटक असलेल्या कुरकुमीनचे प्रमाण अधिक आढळून आल्यामुळे कोकणासाठी ही मोठी उपयुक्ती ठरणार आहे. कोकण वगळता इतर भागातील हळदीमध्ये साधारणपणे दोन ते तीन टक्केच कुरकुमीन आढळून येते. त्या तुलनेत जिल्ह्यातील हळद पिकात दुप्पट कुरकुमीन आढळून आल्यामुळे कोकणसाठी भालेकर-नाईक यांचा प्रयोग सकारात्मक मानला जात आहे.
----------
चौकट
पर्यायी पिक फायदेशीर
जिल्ह्यातील आंबा, काजूसह इतर फळपिके ही बदलत्या वातावरणामुळे बेभरवशाची झाली आहेत. त्यामुळे या लाखो शेतकऱ्यांना सक्षम पर्यायाची गरज आहे. त्यांच्यासाठी भविष्यात हळद लागवड ही चांगला पर्याय ठरू शकेल, असा अंदाज आहे.
----------
चौकट
आंतरपिक म्हणून मोठी संधी
बदलत्या वातावरणामुळे अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, गारपीट, तापमान वाढ यांसारख्या समस्यांना फळबागांना जावे लागत आहे. त्यामुळे या बागांमधील झाडांची वाढ होईपर्यत, हळद हे आंतरपिक म्हणून लागवड करण्यास कोकणात मोठी संधी आहे; मात्र नैसर्गिक लागवडीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यत पोहोचविण्याची गरज आहे.
----------
पॉईंटर्स
* कर्करोग उपचार आणि नियंत्रणासाठी कुरकुमीनचा वापर
* शीघ्रकोपी आतडी रोग, हद्य व रक्तवाहिन्या संबधी रोग, त्वचा विकृती, मुत्रपिंड रोग, संधीवात, अल्झायमर, सांधेदुखी, मधुमेह आणि त्वचा कोड यासाठीही वापर
* विविध औषधी कंपन्यांमध्ये मोठी मागणी
* नैसर्गिक हळद उत्पादनाला शहरांमध्ये मोठी मागणी
* तपासणीत कुरकुमीनचे प्रमाण ५.९९ टक्के तर रासायनिक द्रव्यांचे प्रमाण शुन्य टक्के
---
कोट
प्रतिभा भालेकर-नाईक यांनी लागवड केलेल्या नैसर्गिक हळद लागवड प्रयोगाची आम्ही किर्लोस विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पाहणी केली आहे. त्यांनी अधिकृत लॅबकडून कुरकुमीनचे प्रमाण तपासून घेतले आहे. १०० टक्के नैसर्गिक पध्दतीचा वापर केल्यामुळेच त्यामध्ये कुरकुमीनचे प्रमाण अधिक आहे.
- डॉ. विलास सावंत, प्राध्यापक, किर्लोस विज्ञान केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com