
लोटे एमआयडीसीतील जंगलाला आग
RATCPN२०१.JPG-
७७०३२
लोटेः एमआयडीसी परिसरातील जंगलाला लागलेली आग.
-----
लोटेतील वणव्यात
जंगलभाग खाक
गोशाळेतील गायींच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
चिपळूण, ता. २०ः लोटे (ता. खेड) येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या गोशाळा नजीकच्या जंगलाला गुरुवारी (ता.१९) दुपारी ३ वाजता वणवा लागला. यामुळे संपूर्ण जंगल खाक झाले आहे. १ हजार ६५ गाईंच्या चरण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून इतका चारा उपलब्ध करायचा कोठून यासह अनेक प्रश्न गोशाळा चालकांपुढे उभे ठाकले आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गेल्या अनेक वर्षापासून लोटे परशुराम एमआयडीसी परिसरात गोशाळा चालवत आहे. सध्या या गोशाळेत १ हजार ६५ गाई असून त्यांची देखभाल करण्यासाठी २५ कर्मचारी आहेत. या गोशाळेला शासनाकडून तितकेसे अनुदान मिळत नसल्याने गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे हे कीर्तन सेवा व दानशूरांकडून मिळणाऱ्या मदतीवर या गोशाळेचा गाडा हाकत आहेत. या गाईसाठी दिवसाला हजारो रुपयांचा चारा उपलब्ध करणे शक्य होत नसल्याने या गाईंना दररोज जंगलात नेण्यात येते. तेथील गवत खाऊन या गाईंचा उदरनिर्वाह चालतो. गुरुवारी अज्ञातांनी या गोशाळा परिसरातील जंगलात वणवा लावला. हा प्रकार कोकरे व अन्य कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी जंगलाकडे धाव घेत आग नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही तासातच संपूर्ण जंगल खाक झाले.
-------------
चौकट
आगीचा दुसरा प्रकार
गोशाळा चालवण्यासह कोकरे हे गोवंश हत्येविरोधात कायम लढा देत आहेत. त्यामुळे अनेकजण या गोशाळेला विरोध करीत आहेत. यातूनच काही वर्षापूर्वी गोशाळेच्या चारा डेपोला आग लावण्याचा प्रकार घडला होता तर आता गाई चरत असलेल्या जंगलालाच वणवा लावण्यात आला आहे.
-----------
कोट
समाजकंटक जिंकले, गोभक्त हरलाः भगवान कोकरे
याबाबत बोलताना गोशाळेचे प्रमुख भगवान कोकरे म्हणाले, ज्या जंगलात गाई चरून आपला उदरनिर्वाह करीत होत्या. त्याच जंगलाला चारही बाजूंनी वणवा लावून त्यांचा चारा हिरावून घेण्यात आला आहे. त्यामुळे वणवा लावणारे समाजकंटक जिंकले असून गोभक्त आज हरला आहे. मात्र यातूनही मार्ग काढून आम्ही समाजकंटकांना जशास तसे उत्तर देणार आहोत.