
रत्नागिरी ःविद्यार्थ्यांना ग्रंथालयांचे वर्गणीदार करण्याचा आदेश
विद्यार्थ्यांना ग्रंथालयांचे वर्गणीदार करण्याचा आदेश
दीपक पटवर्धन ; रत्नागिरी नगर वाचनालय राबवणार मोहीम
रत्नागिरी, ता. २१ः शालेय विद्यार्थ्यांना शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे वर्गणीदार करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबाबत सरकारने आदेशच जाहीर केला आहे. येथील जिल्हा नगर वाचनालयातर्फे शालेय विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी म्हणून पुढाकार घेऊन योजना चालवली आहे तसेच या आधी काही विशेष पावलेही उचलली आहेत. आता या ग्रंथालयाचे विद्यार्थ्यांना वर्गणीदार सभासद करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार हे ग्रंथालय आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे, अशी माहिती अध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी दिली.
शालेय विद्यार्थ्यांना शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे वर्गणीदार करण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्याबाबत सरकारने आदेशच जाहीर केला आहे. त्याबाबत माहिती देताना पटवर्धन म्हणाले, आम्ही तर या आधीच मुलांनी वाचनालयाकडे वळावे यासाठी प्रयत्न करत आहोत. आता त्याला सरकारी बळही मिळाले ही आनंदाची गोष्ट आहे. राज्यात १२ हजार १४९ शासनमान्य ग्रंथालये आहेत त्याना हा आदेश लागू आहे. राज्यातील शासकीय व शासनमान्य ग्रंथालयांनी जवळच्या परिसरातील शाळांशी समन्वय साधून आपल्या ग्रंथालयाच्या सेवाकार्याची परिपूर्ण माहिती शाळेला द्यायची आहे. शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे रितसर सभासद अर्ज भरून त्यांना ग्रंथालयांचे वर्गणीदार सभासद करून घ्यावे,असे या शासकीय आदेशात म्हटले आहे. बाल व कुमार वाङ्मयाची, वाचनसाहित्याचे स्वतंत्र दालन निर्माण करावे/स्वतंत्र कपाटात मांडणी करावी जेणेकरून मुलांना हवे ते पुस्तक सहज उपलब्ध होईल. बाल व कुमार वाङ्मय प्रमाणात उपलब्ध करून द्यायचे आहे, असे सागून पटवर्धन म्हणाले,या उपक्रमासाठी आवश्यक बाल व कुमार वाचकांसाठी त्यांच्या वयोगटाला सुयोग्य असलेले बाल व कुमार वाङ्मय नगरवाचनालयात विपुल प्रमाणात आहे.
-------------
चौकट
बालकांसाठी अनेक पुस्तके
वाचनालयातील मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत भाषेतील सुमारे १ लाख ११ हजार ग्रंथ अत्यल्प मासिक शुल्कात वाचनासाठी उपलब्ध आहेत. नवीन प्रकाशित होणारी पुस्तके ८ दिवसात वाचालयात दाखल होतात. वाचनालयाचे स्वतःचे अँन्ड्रॉईड अॅप (प्ले स्टोअर वर विनामुल्य उपलब्ध) मुलांनी वाचावी अशी सुमारे सहा हजार पुस्तके वाचनालयात उपलब्ध आहेत. लहान गोष्टींच्या स्वरुपातील हितोपदेश, सुलभ रामायण, सुलभ महाभारत, श्रीकृष्णाच्या गोष्टी, मारुतीच्या गोष्टी, श्रीगणेशाच्या मंगलगोष्टींचा त्यात समावेश आहे. फास्टर फेणे, बोक्या सातबंडे, चिंटू सारख्या मुलांना आपल्यातल्याच वाटणाऱ्या व्यक्तिरेखांचे पुस्तकमाला संच, बुद्धीचातुर्याची साक्ष देणाऱ्या तेनाली रामन्, बिरबल बादशहा, व्यक्तिरेखांच्या गोष्टींची पुस्तके असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले.