
पारदर्शक कारभारासाठी ‘शिवम पॅनेल’
78285
देवगड ः येथे आमदार नीतेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बाजूला नंदकुमार घाटे. (छायाचित्र ः वैभव केळकर)
पारदर्शक कारभारासाठी ‘शिवम पॅनेल’
नीतेश राणे ः उमेदवार सक्षम असल्याचा दावा
देवगड, ता. २५ ः येथील अर्बन को-ऑप. बँकेचा विकास आणि विस्तारासह सभासदांना पारदर्शक कारभार देण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ‘शिवम सहकार पॅनेल’ रिंगणात उतरवले आहे. जिल्हा बँक आणि तालुका खरेदी विक्री संघातील यशाप्रमाणे अर्बन बँक मतदारांनी पाठीशी रहावे, असे आवाहन आमदार नीतेश राणे यांनी आज येथे मतदारांना केले. पॅनेलचे उमेदवार सक्षम असून बँक योग्य पद्धतीने चालवतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
येथील आमदार संपर्क कार्यालयात भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ‘शिवम् सहकार पॅनेल’च्या झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत श्री. राणे माध्यमांशी बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते नंदकुमार घाटे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाळ खडपे, प्रकाश राणे, जिल्हा बँक संचालक अॅड. प्रकाश बोडस, नगरसेविका प्रणाली माने यांच्यासह पॅनेलचे काही उमेदवार उपस्थित होते.
आमदार श्री. राणे म्हणाले, ‘‘भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाचे संयुक्त पॅनेल अनेक वर्षापासून श्री. घाटे यांच्या नेतृत्वाखाली बँकेत उत्तम पध्दतीने कारभार करीत आहेत. सामान्य नागरिक, शेतकरी यांच्यामध्ये परिवर्तन करून विकास साधण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सहकारामध्ये चांगले काम सुरू आहे. यापूर्वी जिल्हा बँक निवडणूकीत मतदार भाजपच्या पाठीशी राहिले. तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीतही भाजप आणि राष्ट्रवादीच्या पॅनेलने बाजी मारली आहे. त्यामुळे या निवडणूकीतही मतदारांनी पॅनेलच्या पाठीशी रहावे. सहकारमंत्री अमित शहा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे सहकारामध्ये मोठे काम आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने आपोआपच येथील सहकार वाढीला हातभार लागू शकेल.’’
श्री. घाटे म्हणाले, ‘‘मागील सुमारे ३० ते ३५ वर्षे बँकेत ‘शिवम् पॅनेल’ कार्यरत आहे. सुरूवातीला स्थानिक व्यापार्यांनी काढलेल्या बँकेचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आजवर बँकेच्या सभासदांनी टाकलेला विश्वास वाया जावू दिला नाही. त्यामुळे यावेळीही मतदारांनी बँकेच्या पाठीशी राहून पॅनेलला सहकार्य करावे.’’ सुरूवातीला अॅड. बोडस यांनी निवडणुकीबाबत माहिती दिली.
..................
चौकट
...तरच संस्था मोठ्या होतात
सुरूवातीपासूनच आपण सहकाराची कास धरली आहे. स्थानिक सहकारामध्ये वाढ करण्याबरोबरच नवीन संस्था काढून त्या वाढवल्या. परस्पर सहकार्यातून सहकार वाढतो. सहकाराचा कधी वैयक्तिक लाभासाठी उपयोग केला नाही. राजकारण विरहित सहकार वाढीवर भर दिल्यास संस्था मोठ्या होतात, असेही घाटे यांनी यावेळी सांगितले.