
कोयनेचे पाणी दुष्काळी भागाला वळवल्यास पूर नियंत्रण शक्य
ratchlvardha७ .txt
लेख क्र..७
इंट्रो
चिपळुणात येणाऱ्या पुरावर उपाययोजना करताना कोयना धरणातील अतिरिक्त पाणी दुष्काळी भागासाठी वळवल्यास पश्चिम महाराष्ट्रासह चिपळुणातील पुराची तीव्रता कमी होईल. सोलापूर जिल्ह्यातील भीमा-सीना लिंक लिफ्ट सिंचन प्रकल्प या पॅटर्नद्वारे कोयनेचे पाणी दुष्काळी भागासाठी वळवणे शक्य आहे. या प्रकल्पासाठी एकदा खर्च होईल; पण लोकांचे दरवर्षी होणारे नुकसान आणि त्या नुकसानीपोटी दिली जाणारी शासनाची भरपाईचीही रक्कम वाचेल.
- सौरभ कुलकर्णी (बीटेक सिव्हिल)
कळंबस्ते, ता. चिपळूण
----
कोयनेचे पाणी दुष्काळी भागाला वळवून पूर नियंत्रण शक्य
कोयना प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यरेषा असे म्हटले जाते; पण चिपळुणात पूर आला की, त्याचे खापर कोयना धरणाच्या पाण्यावर फोडले जाते. वीजनिर्मितीनंतर पाणी चिपळूणच्या दिशेने सोडले जाते, इतकेच लोकांना माहीत आहे; पण अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी इतर मार्ग आहेत का ? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. चिपळूणच्या पुराची तीव्रता कमी करण्यासाठी कोयना प्रकल्पाची वीजनिर्मिती बंद ठेवली, तर कोयनेसह कोळकेवाडी धरणात अतिरिक्त पाणी साठेल. म्हणजेच हे पाणी कोणत्यातरी दिशेने सोडणे गरजेचे आहे. कोयना धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या महाबळेश्वर, कोयना आणि नवजा या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो; मात्र आटपाडी, विटा, कवठे असे अनेक भाग दुष्काळाने वेढलेले आहेत. कृष्णा पाणी वाटप लवादानुसार कोयना धरणातील पाण्याची मर्यादा निश्चित झाली आणि अतिरिक्त पाणी दुष्काळी भागासाठी कालव्याद्वारे सोडले गेले, तर धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर सोडलेल्या पाण्यामुळे होणारे नुकसान टाळता येईल आणि दुष्काळी भागाला पाणी मिळेल.
सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण आहे. या धरणाच्या पाण्यामुळे पंढरपुरात दरवर्षी पूर येत होता. त्यावर उपाय म्हणून उजनी धरणातील अतिरिक्त पाणी २१ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करून बार्शीजवळील सीना नदीकडे वळवले आहे. त्यामुळे पंढरपूरमधील पुराची समस्या मार्गी लागली. २६ जुलै २००५ मध्येही या कालव्याचा खऱ्या अर्थाने उपयोग झाला. अनेकांचे जीव वाचले. सह्याद्रीचा भौगोलिक अभ्यास करून दुष्काळी भागापर्यंत कालवे काढून कोयनेचे पाणी वळवले, तर हजारो कोटींचे नुकसान वाचणार आहे.
नदीपात्राची खोली वाढवणे, किनारे सक्षम करण्याची गरज
चिपळूण शहरासह परिसरातील गावातील पुराची तीव्रता कमी करायची असेल, तर नदीचे पात्र खोल केले पाहिजे. नदीकिनाऱ्यांची धूप
थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. शिवनदी चिपळूण शहराच्या मध्यभागातून वाहते, तर वाशिष्ठी शहराच्या किनाऱ्यावरून वाहते. सह्याद्री पर्वतांतून येणाऱ्या अनेक छोट्या उपनद्या वाशिष्ठीला येऊन मिळतात. पंधरागाव (ता. खेड) परिसरातील नद्याही वाशिष्ठीला येऊन मिळतात. कोयना प्रकल्पात वीजनिर्मिती झाल्यानंतर वाशिष्ठी नदीत पाणी सोडले जाते. सह्याद्रीत भूस्खलन होत असल्यामुळे पावसाच्या पाण्याबरोबर लहान-मोठे दरड, मातीचा गाळ नदीत येऊन साचत आहे. त्यामुळे नदीपात्राची खोली कमी झाली आहे. वाशिष्ठीचे उगमस्थान असलेल्या पोफळीपासून दाभोळ खाडीपर्यंत नदीचे पात्र उथळ झाले आहे. मुसळधार पाऊस झाल्यानंतर नदीच्या प्रवाह विस्तारतो आणि नदीलगत असलेल्या शहरी भागात प्रवेश करतो. त्यामुळे नदीकिनाऱ्यांवरील मातीचे आवरणही कमी होते. त्यामुळे नदीची खोली कमी होऊन कायम रुंदी वाढत जाते. त्यामुळे पूर टाळण्यासाठी नद्यांची खोली वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी पोफळीपासून दाभोळ खाडीपर्यंत गाळ काढल्याशिवाय पर्याय नाही. काही भागात गाळ काढताना तो नदीकिनारी ठेवला जातो. दुसऱ्या वर्षीच्या पावसाळ्यात हा गाळ पुन्हा नदीत येतो. नदीचा किनारा मजबूत करण्यासाठी काढलेल्या गाळाचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे मुसळधार पावसात नदीची रुंदी वाढणार नाही आणि खोल नदीतून पाण्याचा अधिक स्त्राव शक्य होईल. गाव असो किंवा शहरी भाग तेथील नदीच्या किनाऱ्याची धूप होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिजे. पावसाळ्यात डोंगराळ भागात आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण केले जाते. नदीकिनारी वृक्षारोपण झाल्यास किनाऱ्याची धूप कमी प्रमाणात होईल.
स्थानिक पातळीवर हवे बचाव पथक
वाशिष्ठी नदीला योग्य आकार दिल्यास येथे बोटिंगसाठी खूप वाव आहे. एनडीआरएफच्या धर्तीवर स्थानिक पातळीवर सुरक्षापथक आणि बोटी तयार केल्यास पर्यटन वाढेल आणि महापुरात या बोटी आणि सुरक्षापथकाची बचावकार्यात मोठी मदत होईल. एनडीआरएफचे बटालियन चिपळूण शहरापासून ८ तासाच्या अंतरावर आहे. २२ जुलैच्या महापुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. १२ तासानंतर एनडीआरएफची टीम चिपळुणात पोहचली. २००५ मध्ये आलेल्या पुरानंतर चिपळूण शहरासाठी बचाव बोटींची व्यवस्था केली होती; पण त्यानंतर वापर न झाल्यामुळे या बोटी उखडल्या गेल्या आणि जेव्हा सर्वात जास्त गरज होती तेव्हा ती वापरता आली नाही. कुणालाही दोष न देत यापुढे एनडीआरएफसारखे बचावपथक स्थानिक पातळीवरच तयार करण्याची गरज आहे. स्थानिक पातळीवर बोट उपलब्ध झाल्या पाहिजेत, म्हणजे एनडीआरएफची टीम येण्यापूर्वीच स्थानिक पथकामार्फत बचावकार्य सुरू होईल. असे पथक तयार झाल्यास त्यांना एनडीआरएफकडून कवायती आणि इतर प्रशिक्षण दिले जाते. मुंबईतील एनडीआरएफच्या पथकामार्फत गेल्या वर्षी ठिकठिकाणी असे प्रशिक्षण दिले आहे. वाशिष्ठी नदीपात्रात खेर्डी, कळंबस्ते, गोवळकोट, बहादूरशेख नाका, गांधारेश्वर आणि पेठमाप या भागात असे पथक तैनात करणे शक्य आहे. वर्षभरातील इतर दिवसांमध्ये या नौकांमध्ये वॉटरसफारी, रिव्हर बोटिंग अॅक्टिव्हेट करता येईल. कोकणातील निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येईल आणि गंभीर पूरपरिस्थितीत या बोटी बचावासाठी सहज उपलब्ध होतील. पंढरपूर येथील चंद्रभागाच्या नदीवर हे पॅटर्न राबवण्यात आले आहे. येथे वर्षभर १०० पेक्षा जास्त बोटी धावतात. पुराच्या वेळी या बोटी बचाव नौका म्हणून काम करतात आणि इतर दिवशी त्यांचा वापर करून पर्यटन आणि प्रवासासाठी केला जातो.
................
चौकट
प्रवाहातील बेटासारखे क्षेत्र काढण्याची गरज
वाशिष्टी नदी अनेक ठिकाणी दोन उपप्रवाहांमध्ये विभागली गेली आहे. अनेक ठिकाणी उपप्रवाहांमध्ये बेटासारखे क्षेत्र तयार झाले आहे ते काढण्यात आले, तर पाण्याच्या प्रवाहाची रुंदी वाढवता येईल. त्यात बोटिंग करता येईल. शहराच्या हद्दीत येणाऱ्या पाण्याचा प्रवेश टाळता येईल. अनेक वेळा अरबी समुद्राचे क्षारयुक्त पाणी नदीपर्यंत येते. नळपाणी योजनेतून या पाण्याचा पुरवठा झाल्यास लोक आजारी पडतात. ही समस्या मार्गी लागेल.
..............
चौकट
थेट पाईपलाईनने पाणी पुरवठ्याची गरज
लोटे, गाणे खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीसाठी वाशिष्ठी नदीतून दररोज २३ एमएलडी पाणी उचलले जाते. अतिरिक्त लोटे एमआयडीसीमुळे पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. कोळकेवाडी धरणातून थेट पाइपलाइनने एमआयडीसीला पाणीपुरवठा झाल्यास पुराची तीव्रता कमी होईल आणि एमआयडीसीची पाण्याची मागणी पूर्ण होईल. अंजनवेल (ता. गुहागर) येथील रत्नागिरी गॅस पॉवर प्रकल्पासाठी चिपळूणमधून पाणीपुरवठा होतो. कोळकेवाडी धरणातून थेट एमआयडीसीला पाणीपुरवठा करणे शक्य आहे.