
शिवराजेश्वर मंदिरात भव्य सिंहासन
78666
मालवण ः किल्ले सिंधुदुर्गमधील शिवराजेश्वर मंदिरात साकारण्यात येत असलेल्या सिंहासनाची आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली.
शिवराजेश्वर मंदिरात भव्य सिंहासन
आमदार नाईकांकडून पाहणी; मंदिराचेही काम तातडीने सुरू होणार
मालवण, ता. २७ : महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विशेष निधीतून किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात भव्य सिंहासन साकारण्यात येत आहे. सिंहासनाचे काम अंतिम टप्प्यात आले असून दोन दिवसांत हे काम पूर्ण होणार आहे. दरम्यान आमदार नाईक यांनी आज सायंकाळी येथे भेट देऊन कामाची पाहणी केली. मंदिराचे काम देखील तातडीने सुरु होणार असून किल्ल्यावर पर्यटकांसाठी अधिकाधिक सुविधा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मंदिराचे विश्वस्त सयाजी सकपाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, मंदार ओरसकर, वायरी भूतनथ सरपंच भगवान लुडबे, सिद्धेश मांजरेकर, सन्मेष परब, दत्ता पोईपकर, अनंत पाटकर आदी उपस्थित होते. या सिंहासनाचे काम कोल्हापूर येथील अशोक सुतार आणि कारागीर करत आहेत. त्यांनी अनेक ऐतिहासिक कामे केली असून कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरातील नवीन मूर्ती त्यांनी साकारली आहे.
आमदार नाईक म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे देशातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर आहे. त्यामुळे हे ठिकाण तमाम शिवप्रेमींसाठी आदराचे स्थान आहे. हे सिंहासन साकारताना पुरातत्व विभागाच्या अनेक अडचणी होत्या. त्यामुळे हे काम रखडले होते; मात्र या अडचणींवर मात करून हे सिंहासन साकारण्यात येत आहे. मंदिराची फरशी बसवणे आणि अन्य कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी नवीन जेटी मंजूर झाली आहे. त्याचे टेंडर निघाले असून या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. किल्ल्यावर लाईट शो उभारण्यााठी प्रयत्न करत असून किल्ल्यावरील स्वच्छतेकडे लक्ष देण्याची सुचना सरपंच भगवान लुडबे यांना केल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
---
स्थगिती उठवण्याची सरकारकडे मागणी
किल्ल्यावर वीज, पाण्याच्या सुविधेसाठी पाच कोटी मंजूर झाले आहेत; मात्र या कामाला नवीन सरकारने स्थगिती दिली आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या एका बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे ही स्थगिती उठवण्यासाठी मागणी केली आहे. याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हे मंदिर सर्वांचे आदर स्थान आहे. त्यामुळे या कामावरील स्थगिती उठेल, असा विश्वास आहे. सरसंघचालक मोहन भागवत हे किल्ल्यावर येणार आहेत, त्यांचेही याकडे किल्ला रहिवासी लक्ष वेधतील, असेही ते म्हणाले.