
आंगणेवाडी यात्रेसाठी प्रशासन सज्ज
आंगणेवाडी यात्रेसाठी प्रशासन सज्ज
जिल्हाधिकारी ः सिंधुदुर्गनगरीत गतिरोधकांबाबत विचार
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः जिल्ह्यात ४ फेब्रुवारीला होणाऱ्या आंगणेवाडी यात्रेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. राज्यातील येणाऱ्या मंत्री व अन्य लोकप्रतिनिधींच्या सुरक्षा व्यवस्थेसह यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी, यादृष्टीने नियोजन केले आहे. याबाबत पोलिस यंत्रणा व अन्य सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील या महत्त्वाच्या यात्रेसाठी कायमस्वरुपी स्वच्छतागृह उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाने नियोजन केले असून पुढील वर्षांत ही स्वच्छतागृहे उभी होतील, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
सिंधुदुर्गनगरी येथील कोकण शिक्षक पदवीधर निवडणुकीची माहिती देताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात असलेली सर्कल अपघाताला आमंत्रण ठरत असल्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली आहे. प्राधिकरण क्षेत्रात गतिरोधक टाकण्याबाबत योग्य ती कार्यवाही प्रशासनामार्फत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, ‘‘सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत व्हावी, यादृष्टीने शासनाकडे पुन्हा पाठपुरावा प्रस्ताव सादर केला आहे. येथील अस्वच्छता आणि झाडीझुडपे यामुळे रस्त्याच्या सर्कल परिसरामध्ये गेल्या काही महिन्यांत अपघात घडले. दोन दिवसांपूर्वी व त्याआधी झालेल्या अपघाताचे प्रकार लक्षात घेता पोलिस अधीक्षक कार्यालय सर्कल, सिडको कार्यालय सर्कल, जिल्हा रुग्णालय नजीक मालवणकडे जाणारा रस्ता, डॉन बॉस्को सर्कल तसेच सामाजिक न्याय भवन व अन्य ठिकाणी असलेल्या सर्कलमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या भागात गतिरोधक अथवा रंबलरसारखी व्यवस्था तसेच वाहतूक पोलिस यंत्रणा उभी करण्याच्या दृष्टीने विचार केला जाईल.’’