
आम्ही विकासाने मने जिंकतो, समाधानाने पक्ष वाढवितो
विकासाने मने जिंकतो;
समाधानाने पक्ष वाढवितो
उद्योगमंत्री सामंत; राज्यात आमचेच सरकार येणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः ‘‘आम्ही विकासाने लोकांची मने जिंकतो. आमच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षात समाधानी वृत्ती असणारे लोकप्रतिनिधी येत आहेत. समाधानाने आम्ही पक्ष वाढवत आहोत,’’ असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे सांगितले. २००४ ते २०१९ पर्यंतच्या निवडणुकींबाबतचे चार सर्व्हे मी पाहिले आहेत. त्याने काही परिवर्तन होत नाही. पुढील निवडणुकीनंतर राज्यात आमचेच सरकार येणार आणि ४२ हून अधिक खासदारांसह आम्ही लोकसभेत जाणार, असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
मंत्री सामंत म्हणाले, ‘‘पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काहीजण आमच्या सरकारवर टीका करत आहेत. मात्र टीका करणारे सत्तेत असताना त्यांनी याबाबत काय केले याचे आत्मचिंतन करावे. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधून राज्यात १ लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. त्यात परकीय गुंतवणूकही आहे. मला राज्यातील तरूणाईसाठी रोजगार निर्मिती करायची आहे. त्यामुळे ट्वीट आणि टीका टिप्पणीकडे मी लक्ष देत नाही. मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेअंतर्गत सीमाभागात उद्योग उभारणीसाठी कर्ज वितरण केले जाणार आहे.’’
सीमाभागातील
विद्यार्थ्यांना न्याय देणार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांना सरळसेवा परीक्षा देता यावी याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत मी चर्चा करणार आहे. या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.