
संक्षिप्त-झुलत्या पुलासाठी निधीची शिफारस
झुलत्या पुलासाठी
निधीची शिफारस
शिरोडा ः पर्यटन विकास नावीन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत शिरोडा वेळागर ते रेडी यशवंत गड झुलते पादचारी पूल होण्याची मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य प्रीतेश राऊळ व रेडी व शिरोडा आजी-माजी सरपंचांनी केली होती. या मागणीची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दखल घेत झुलत्या पुलासाठी व पर्यटन विकासासाठी निधी द्यावा, असे पत्र पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांना दिले आहे. याबाबत रेडी जिल्हा परिषद मतदार संघाचे माजी सदस्य प्रीतेश राऊळ, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, रेडी सरपंच रामसिंग राणे यांनी पालकमंत्री चव्हाण यांना निवेदन दिले होते. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन विकास माध्यमातून या पुलाचे काम मंजुरी व पूर्णत्वाची मागणी लक्षात घेऊन पर्यटन विकास साधावा, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल पालकमंत्र्यांनी घेत निधीसाठी शिफारसपत्र पर्यटन मंत्र्यांना दिले आहे, असे राऊळ म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांचा
वेंगुर्लेत स्नेहमेळा
वेंगुर्ले ः ज्येष्ठ नागरिक संघ, वेंगुर्ले यांच्यावतीने १२ फेब्रुवारीला सकाळी १० ते २ या वेळेत साई मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात विविध वर्षभर राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांचा तसेच संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच जाणकारांचे मार्गदर्शन ठेवले असून सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे अध्यक्ष रा. पां. जोशी यांनी केले आहे.
दोडामार्ग येथे
उडान महोत्सव
दोडामार्ग ः येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात २ फेब्रुवारीला मुंबई विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे ‘उड़ान : द फ्लाईट ऑफ एक्सटेन्शन २०२३’ चे आयोजन केले आहे. महोत्सवात जिल्ह्यातील १४ महाविद्यालये सहभागी होणार आहेत. यात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या पथनाट्य, भित्तीपत्रक, पोवाडा, सृजनशील लेखन, वक्तृत्व आदी स्पर्धांचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे प्रभारी संचालक डॉ. कुणाल जाधव यांच्या उपस्थितीत होणार असून विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यात सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी केले आहे.
आरोग्य चिकित्सा
शिबिर आरवलीत
वेंगुर्लेः श्री देव वेतोबा देवस्थान आरवली व आनंद सेवा प्रतिष्ठान आरवली यांच्यातर्फे मोफत मधुमेह चिकित्सा व यकृत तपासणी शिबिराचे आयोजन ५ फेब्रुवारीला सकाळी ८.३० वाजता श्री देव वेतोबा अन्नशांती सभागृहात केले आहे. शिबिरात गरजू रुग्णांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे. शिबिरात गोवा येथील अंतस्त्राव ग्रंथीतज्ज्ञ व मधुमेह तज्ज्ञ एमबीबीएस (मुंबई) डॉ. मनीष कुशे, मधुमेह व अंतस्त्राव ग्रंथीतज्ज्ञ डॉ. पाटणकर आणि डॉ. दिगंबर नाईक आदी उपस्थित राहून रुग्णांची करणार आहेत. माहितीसाठी र. ग. खटखटे ग्रंथालय शिरोडा येथे कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तळेखोल येथे
झाडाला आग
दोडामार्गः तळेखोल येथे ग्रामदेवतेच्या मंदिरासमोरील भागात एका मोठ्या झाडाला शुक्रवारी आग लागली. ही आग नियंत्रणात आणण्यासाठी सावंतवाडी, वेंगुर्लेसह गोव्यातील डिचोली, म्हापसा, पणजीपर्यंतचे बंब मागविण्यात आले; मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. ठाकरे गट शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी प्रयत्न केले. अखेर कुडाळ येथून आलेल्या अग्निशमन बंबाद्वारे आग आटोक्यात आणली गेली. दोडामार्ग पोलिस प्रशासन तसेच मंडळ अधिकारी राजन गवस आदींनी यांचेही सहकार्य लाभले. आगीचे कारण समजू शकले नाही.