
''इन्स्पीरेशनल वॉल'' उपक्रमाचे सावंतवाडीत आज उद्घाटन
‘इन्स्पीरेशनल वॉल’ उपक्रमाचे
सावंतवाडीत आज उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३०ः विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना कशा पध्दतीचे शिक्षण घ्यावे, कोणता व्यवसाय अथवा नोकरी निवडावी याबाबत प्रेरणा मिळावी, या उद्देशाने येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत ''इन्स्पीरेशनल वॉल'' हा आगळा वेगळा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आपल्या जीवनात यशस्वी झालेल्या माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा या प्रेरणादायी भिंतीच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहे. विद्यार्थी संबंधित व्यक्तीशी थेट संपर्क साधून मार्गदर्शन घेऊ शकणार आहेत. या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन उद्या (ता. ३१) गायक स्वप्निल बांदोडकर यांच्या हस्ते होणार आहे.
येथील कळसुलकर शाळेच्या परिसरात दुपारी ३ वाजता हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. १९९२-९३ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने ही संकल्पना राबविली जात आहे. याबाबतची माहिती माजी विद्यार्थी व उद्योजक नीरज देसाई यांनी दिली. या उपक्रमांतर्गत शाळेत शिकलेल्या आणि आपल्या जीवनात उच्च शिखरापर्यंत पोहोचलेल्या माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा मांडण्यात येणार आहे. यात डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पत्रकार यांच्यासह अधिकारी, उद्योजक, व्यावसायिक यांचा जीवनप्रवास या वॉलच्या माध्यमातून तरुण पिढीसमोर मांडणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. या कार्यक्रमास आंतराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी, मुंबईतील एन. के. टी. कॉलेजचे ट्रस्टी परेश ठक्कर, सरस्वती विद्यालय मुंबईचे ट्रस्टी जिग्नेश पटेल आदी उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई असणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन माजी विद्यार्थ्यांनी केले आहे.