
पान एक-शिक्षक मतदार संघासाठी सिंधुदुर्गात 97.41 टक्के मतदान
७९३५२
शिक्षक मतदार संघासाठी
सिंधुदुर्गात ९७.४१ टक्के मतदान
प्रक्रियेत शांततेत ः २ फेब्रुवारीला मतमोजणी
ओरोस, ता. ३० ः कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यातील १९ मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया पार पडली. २१६४ मतदारांपैकी २१०८ मतदारांनी मतदान केल्याने एकूण ९७.४१ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यात एकुण १९ केंद्रावर मतदान झाले. सर्वाधीक मतदार सावंतवाडी तालुक्यात होते. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत प्रक्रिया पार पडली. मतदानासाठी ईव्हीएम मशीन न वापरता जुन्या पद्धतीने अर्थात मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आले. यासाठी ८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांच्यात खरी चुरस पहायला मिळाली. कोकण विभाग शिक्षक मतदार संघात ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा ५ जिल्ह्यांचा समावेश आहे. मतदान प्रक्रियेसाठी एकूण २०३ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. १४५६ पुरुष आणि ७०८ स्त्रिया अशा एकूण २१६४ मतदान निश्चित झाले होते. यातील १४१९ पुरुष तर ६८९ महिला मतदारांनी मतदान केल्याने एकूण २१०८ एवढे मतदान झाले.
ही निवडणूक भाजप, बाळासाहेबांची शिवसेना आणि महाविकास आघाडी यांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे कोण बाजी मारणार? हे मतमोजणी दिवशी २ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे. मतमोजणी ठाणे येथे होणार असल्याने पोलीस बंदोबस्तात मतपेट्या मतमोजणी ठिकाणी नेण्यात येणार आहेत.